Pimpri : 824 फूट खोल असणारा वजराई धबधबा उतरण्याची मोहीम फत्ते; मोहिमेत दहा वर्षांच्या बालकाचाही समावेश


दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेचा उपक्रम

एमपीसी न्यूज – पुण्यापासुन 130 किलोमीटर तर ऐतिहासिक सातारा शहरापासून केवळ 27 किलोमीटर अंतरावर विस्तीर्ण पठारी प्रदेशात वसलेले कासचे पठार जगातल्या प्रत्येक पुष्पप्रेमीला खुणावते. या पठाराच्या बाजूलाच वजराई धबधबा आहे. हा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. याची उंची सुमारे 254 मीटर म्हणजेच तब्बल 824 फूट एवढी आहे. या धबधब्यावरून दोरीच्या साहाय्याने कोणी खाली उतरेल अशी कल्पना देखील करवत नाही, एवढा आव्हानात्मक हा धबधबा आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरातील दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्था वेळोवेळी दुर्गभ्रमण, गिरिभ्रमण यांसारखे उपक्रम राबवत असते. संस्थेचे पदाधिकारी मागील काही महिन्यांपासून या धबधब्यावरून दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्याचे नियोजन करीत होते. पण मोठमोठ्या खडकांना भलीमोठी मधमाशांची पोळे पाहून मोहीम काही वेळेला रद्द करावी लागली. यावेळी मात्र मधमाशांनी काहीशी उसंत दिली आणि दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेचे सर्व सदस्य कामाला लागले. धबधबा उतरण्याचा दिवस निश्चित झाला.

ठरल्याप्रमाणे शनिवार (दि. 20) व रविवार (दि. 21) रोजी मोहीम राबविण्यात आली. शनिवारी सर्व सदस्य धबधब्याच्या जवळच अगदी पाऊण तासाच्या चालण्याच्या अंतरावर असलेल्या भांबवली गावात पोहोचले. भांबवली गावाला निसर्गाचे वरदान मिळाल्याने व्यावसायिक पर्यटनाने इथे चांगलाच जम बसवला आहे. पावसाळ्यात पाण्याचा जोर प्रचंड असल्याने धबधबा दुरूनच पाहावा लागतो. पण जानेवारी पर्यंत पाणी ब-यापैकी ओसरले असल्याने तिथवर जाता येते. भांबवली गावाला ऐतिहासिक आणि सांप्रदायिक वारसा देखील लाभला आहे.

गावातील जुनी जाणती माणसे सांगतात की, "समर्थ रामदासांनी धबधबा असलेला डोंगर तीन पावलात चढला. या चमत्कारातून वजराई धबधबा मिळून आला. तेंव्हापासून या डोंगराला ‘तीन पावली धबधबा डोंगर’ म्हणून ओळखले जाते." तसेच या गावात व परिसरात अनेक पौराणिक मंदिरे आहेत. 

धबधबा उतरण्यासाठी संस्थेच्या सदस्यांनी प्रथम दोन ते तीन वेळा पाहणी दौरा केला. सर्व काही सुरक्षित असल्याचे समजताच दोन दिवसीय मोहीमेला प्रारंभ केला. या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी गिर्यारोहक धनराज पिसाळ यांनी केले. शनिवारी (दि. 20) दुपारी दीड वाजता कास गावात पोहोचून सर्व तयारी पूर्ण केली. संघनायकांनी रॅपलिंग करण्यासाठी स्टेशन फिक्स केले. मोहिमेचा पहिला टप्पा अतिशय थरारक 380 फुटांचा होता. यामध्ये केवळ 20 फुटापर्यंत खडक होता आणि नंतर पूर्ण अोहरहँग होता. दुसरा टप्पा 260 फुटांचा व तिसरा टप्पा 184 फुटांचा होता. तीनही टप्पे पूर्ण ओवरहँग आहेत.

पहिल्या दिवशी रोप फिक्स करण्यात आले. त्यानंतर रँपलींगला सुरुवात झाली. मोहिमेचा श्रीगणेशा संघनायकाने केला. पहिल्या दिवशी पाच दुर्गप्रेमींनी दुस-या टप्प्यापर्यंत आगेकुच केली. तोपर्यंत अंधार पडल्यामुळे पुढील मोहीम तहकूब करत भांबवली गाव गाठले.

दुस-या दिवशी खरी कसोटी लागणार होती. कारण दुस-या दिवशी काही नवख्यांचा समावेश होणार होता. पुण्याहून काही जण तर साता-याहून काही दुर्गप्रेमी येणार होते. त्यानुसार रविवारी सकाळी 24 जणांचा ताफा पूर्ण तयारीनिशी पुन्हा धबधब्याकडे रवाना झाला. संघनायकांनी संपूर्ण साहित्याची माहिती देऊन नियमांची कानउघाडनी केली. सर्व साहित्यांची जुळवा जळव झाल्यानंतर थराराला सुरुवात झाली.

एक-एक करत आठ लोकांनी पहिला टप्पा सर केला, दुस-या टप्प्यावरही जबाबदार संघनायकांनी भार संभाळला व एक-एक करुन सर्वांना तिस-या टप्प्यावर उतरवले. पुन्हा तिस-या टप्प्यावर जबाबदार संघनायकांनी भार संभाळला व एक-एक करुन सर्वांना खाली पोहचवले. असे करत एकूण 24 पैकी 22 दुर्गप्रेमींनी सुखरूपपणे रॅपल करुन ही मोहीम फत्ते केली. मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे या मोहिमेत अवघा दहा वर्षांचा पार्थ संतोष माने देखील सहभागी झाला होता. केवळ सहभागच नाही तर त्याने दोराच्या साहाय्याने संपूर्ण धबधबा यशस्वीपणे खाली उतरला सुद्धा.

संपूर्ण मोहिमेदरम्यान एक समूह या सर्व मोहिमेवर दुर्बीण आणि कॅमे-याच्या माध्यमातून सतत लक्ष ठेवत होता. मोहिमेमध्ये सुनिल पिसाळ, धनराज पिसाळ, गणेश पिसाळ, धनंजय सपकाळ, गणेश पठारे, रमेश वैद्य, विश्वजीत पिसाळ, सदगुरु काटकर, रवींद्र गायकवाड, दिनेश सुंटले, विशाल फरांदे, संदिप जाधव, अमोल पिसाळ, सचिन निगडे, प्रकाश मोरे, संतोष माने, पार्थ माने (वय 10), रोहित मोटवानी, विजय पिसाळ, संदीप गायकवाड, अमृत देशमुख, विशाल पिसाळ, संदीप गुरव, हर्षद पिसाळ आदींनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.