Pimpri : आवास योजनेच्या आकुर्डी, पिंपरीतील गृहप्रकल्पास 84 कोटीचा खर्च

स्थायी समितीची मान्यता 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आकुर्डी, पिंपरी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घरांसाठी निविदा प्रक्रियेतील स्पेसिफिकेशनमध्ये फेरबदल करून निविदा मागविल्यानंतर या दोन्ही प्रकल्पांसाठी 84 कोटी 32 लाख रुपये लघुत्तम दर सादर केलेल्या एकाच ठेकेदाराला हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज (शुक्रवारी)झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

केंद्र सरकारमार्फत सर्वांसाठी घरे – 2022 या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना अभियान राबविण्यात येत आहे. महापालिका मंजूर विकास आराखड्यात शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) आणि बेघरांसाठी घरे (एचडीएच) या योजनांसाठी जागांची आरक्षणे आहेत. या जागा ताब्यात आल्यानंतर त्याठिकाणी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
शहराच्या विविध भागात 10 ठिकाणी 9 हजार 458  सदनिका बांधण्याचे नियोजन आहे.

त्यानुसार च-होली येथे 1442, रावेतमध्ये 934, डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, मोशी – बो-हाडेवाडीमध्ये 1288, वडमुखवाडीत 1400, चिखलीमध्ये 1400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि आकुर्डीमध्ये 500 सदनिका उभारण्याचे प्रस्तावित आहे. महापालिकेने या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून आधी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला. राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने नोव्हेंबर 2017 मध्ये महापालिकेच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी देऊन ते केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविले होते. केंद्रानेही महापालिकेच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी दिली आहे.

आकुर्डी येथील आरक्षण क्रमांक 283 येथील बेघरांसाठी घरे (एचडीएच) या आरक्षित जागेवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) 568 घरे बांधण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) केंद्र सरकारच्या केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने 7 फेब्रुवारी 2018 रोजी मान्यता दिली. त्यानुसार, महापालिकेने या कामांसाठी निविदा मागविल्या. सुरुवातीला बांधकामाचा अंदाजित खर्च 54 कोटी 80 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला.

पिंपरीतील आरक्षण क्रमांक 77 येथील घरांसाठी 15 जून 2018 रोजी निविदा मागविण्यात आल्या. या बांधकामाचा अंदाजित खर्च 35 कोटी 68 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला. 15 जुलै 2018 रोजी निविदा सादर करण्याची मुदत ठेवण्यात आली. मात्र, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत निविदा प्रक्रियेतील राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे आकुर्डी, पिंपरी येथील 90 कोटी 48 लाख रुपयांच्या कामांच्या फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा खर्च 86 कोटी 41 लाखांवर आणण्यात आला.

निविदेतील स्पेसिफिकेशनमध्ये फेरबदल केल्याने निविदेचा खर्च चार कोटींनी कमी झाला. या बांधकामामध्ये इमारतीच्या भितींना प्लास्टर करताना जिप्सममऐवजी पुट्टी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे बांधकाम खर्च कमी होणार आहे.  त्यानुसार, आकुर्डीतील प्रकल्पासाठी 54 कोटी 80 लाख रुपयांऐवजी 52 कोटी 76 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. तर, पिंपरीतील घरांसाठी 33 कोटी 64 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. 24 सप्टेंबर 2018 पर्यंत निविदा सादर करण्याची मुदत ठेवण्यात आली. त्यानुसार, नटवर कन्स्ट्रक्‍शन यांनी आकुर्डीतील घरांसाठी 52 कोटी 50 लाख रुपये तर पिंपरीतील घरांसाठी 31 कोटी 82 लाख रुपये असा लघुत्तम दर सादर केला.

महापालिकेमार्फत दर कमी करण्याबाबत पत्राद्वारे विचारणा केली असता ठेकेदाराने या कामासाठी दिलेला मूळ दर मान्य करण्याबाबत कळविले. राज्य सरकारच्या सन 2017-18 च्या दरसूचीत जीएसटी करासह टेसिंटग चार्जेस, आरसीसी डिझाईन, चार्जेस, सिमेंट आणि स्टील फरक व रॉयल्टी चार्जेसह कामाची किंमत अनुक्रमे 55 कोटी 96 लाख आणि 34 कोटी 44 लाख रुपये इतकी येते. नटवर कन्स्ट्रक्‍शन यांनी सादर केलेला दर एसएसआर 2017-18 नुसार निविदा स्वीकृत दरापेक्षा अनुक्रमे 6.18 टक्के आणि 7.62 टक्‍क्‍याने कमी आहे. त्यानुसार, नटवर कन्स्ट्रक्‍शन यांच्यामार्फत दोन्ही प्रकल्पांसाठी सादर केलेला 84 कोटी 32 लाख रुपये दर अधिक रॉयल्टी आणि मटेरियल टेसिंटग चार्जेससह काम करून घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.