Pimpri News : महापालिकेच्या 9 हजार 824 अधिकाऱ्यांना जानेवारीत मिळणार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते

एमपीसी न्यूज – पालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आजी-माजी 9 हजार 824 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे पहिले दोन हप्ते जानेवारी 2021 मध्ये मिळणार आहेत.

याबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी माहिती दिली. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे उपस्थित होते.

महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत आहे. सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जून 2020 पासून सुरु झाली. दरम्यान 1 जानेवारी 2016 ते 31 मे 2020 या कालावधीतील वेतनातील फरक सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

हा फरक सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाच टप्प्यात देण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षातील जानेवारी आणि जुलै महिना, असे फरक देण्याचे टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार जुलै 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये देण्यात येणाऱ्या दोन टप्प्यातील फरक एकत्रित देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 140 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्या खर्चाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे.

उरलेले तीन हप्ते प्रत्येक वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्यात देण्यात येणार आहेत. महापालिका सेवेत कार्यरत असलेले 7 हजार 624 अधिकारी – कर्मचारी आणि सेवानिवृत्त झालेले 2 हजार 200 अधिकारी कर्मचारी असे एकूण 9 हजार 824 अधिकारी – कर्मचाऱ्यांना हा फरक देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.