Pimpri : आगाराच्या विश्रामगृहातून बसचालकाचा मोबाईल चोरला

एमपीसी न्यूज – वल्लभनगर बस आगाराच्या कर्मचारी विश्रामगृहातून एका बस चालकाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 29) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली आहे.

प्रमोद ज्ञानेश्वर जुनगरे (वय 38, रा. यवतमाळ) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आगारात चालक म्हणून काम करतात. त्यांनी चार महिन्यांपूर्वी ‘रेडमी गो’ हा मोबाईल फोन विकत घेतला होता. शनिवारी ते देवगड ते पुणे ही बस घेऊन आले. रात्री साडेआठच्या सुमारास वल्लभनगर एस टी आगारात पोहोचले. त्यानंतर रविवारी सकाळी तीच बस घेऊन त्यांना देवगडला जायचे होते. त्यामुळे ते वल्लभनगर आगारातील कर्मचारी विश्रामगृहात गेले.

रात्री मोबाईल फोनवर मनोरंजनाचे कार्यक्रम बघत असताना त्यांना झोप लागली. रात्री अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल फोन चोरून नेला. रविवारी पहाटे चारच्या सुमारास ते झोपेतून उठले असता त्यांचा मोबाईल फोन मिळाला नाही. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.