Pimpri : गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री करणा-यांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताची औषधे देण्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधे घेतल्यास त्याचे संभाव्य धोके टाळता येतात. मात्र डॉक्टरांच्या कुठल्याही सल्ल्याशिवाय ऑनलाईन शॉपिंग साईटवरून ही औषधे राजरोजपणे मिळत आहेत, अशी ऑनलाईन माध्यमातून राजरोसपणे विक्री करणा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाग्यश्री यादव (वय 42, रा. धनकवडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • अ‍ॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून गर्भपाताची औषधे (अनवॉन्टेड किट) सहज उपलब्ध होत आहेत. त्यासोबत कोणतेही प्रिस्क्रिप्शन देण्यात येत नाही. गर्भपात करणे हे कायद्याने गुन्हा आहे. नोंदणीकृत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तसेच त्यांच्या चिट्ठीशिवाय गर्भपाताची औषधे मिळत नाहीत.मात्र, अ‍ॅमेझॉनसारख्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून ही गर्भपाताची औषधे (mankind – unwanted kit) राजरोसपणे विकली जात आहेत.

पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांच्याकडे काही नागरिक व मेडिकल दुकानदारांच्या तक्रारी आल्या की ‘डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न मिळणारी औषधे ऑनलाईन साईटवर राजरोसपणे मिळत आहेत.’ ही माहिती पडताळण्यासाठी त्यांनी ऑनलाईन माध्यमातून अनवॉन्टेड किटची ऑर्डर दिली. त्यांना कोणतीही चौकशी केल्याशिवाय ती किट पार्सल मिळाली.

  • उत्तर प्रदेश येथील बीटल मेडिकल स्टोअरमधून अ‍ॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटच्या माध्यमातून मॅनकाईन्ड कंपनीची औषधे विकली जात आहेत. याबाबतची वेळोवेळी तक्रार तापकीर यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.