Pimpri: पंतप्रधानांच्या ‘लॉकडाऊन’च्या घोषणेनंतर किराणा व भाजीपाला खरेदीसाठी झुंबड!

एमपीसी न्यूज – कोरोना नियंत्रणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यरात्रीपासून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशात लोकांची एकच तारांबळ उडाली आहे. घरात किमान महिनाभर पुरेल एवढा अन्न-धान्याचा साठा करून ठेवण्यासाठी किराणामालाच्या दुकानामध्ये लोकांची अक्षरश: झुंबड उडाली आहे.

संचारबंदीच्या आदेशाला न जुमानता लोकांनी आपल्या घराजवळील किराणामालाच्या दुकानांकडे धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी कॅम्पमधील होलसेल किराणा मालाच्या दुकानांमध्ये तर पाय ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती आहे. बंद झालेली भाजीपाल्याची दुकाने देखील रात्री पुन्हा उघडण्यात आली. भाजीपाला खरेदीसाठीही रात्री उशिरापर्यंत लोकांची गर्दी होती.

पंतप्रधानांनी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला असला तर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात त्यात पुढे आणखी काही दिवसांची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत घरामध्ये पुरेसा अन्न-धान्य साठा करून ठेवण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.