Pimpri: सरकारने महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावीच; भाजप आमदाराचे खुले आव्हान

एमपीसी न्यूज – राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावी. भाजपच्या तीन वर्षातील कार्यकाळातील कारभाराची चौकशी करावीच, असे खुले आव्हान भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे राज्य सरकार जगताप यांचे आव्हान स्वीकारुन चौकशी करणार का? याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महापालिकेच्या मागील तीस वर्षातील कारभाराची देखील चौकशी करावी, असेही ते म्हणाले.

पिंपरी, मोरवाडीतील भाजपच्या पक्ष कार्यालयात आज (शनिवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार जगताप यांनी राज्य सरकारला चौकशी करण्याचे आव्हान दिले. यावेळी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, सभागृह नेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, उमा खापरे, बाबू नायर, सीमा सावळे आदी उपस्थित होते.

भाजपने सत्तेवर असताना राज्यभरात 33 कोटी वृक्ष लागवड केल्याचा दावा केला होता. ही वृक्ष लागवड झाली नसल्याची शंका घेत महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी वृक्ष लागवडीचे चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेचा तीन वर्षांत दीड लाख झाडे लावल्याचा दावा आहे, याबाबत आमदार जगताप यांना विचारले असता ते म्हणाले महापालिकेने दीड लाख झाडे लावली आहेत. तसेच या झाडांचे पाच वर्ष संवर्धन करण्याचे काम संबंधित ठेकेदाराचे आहे. त्यामुळे सरकारला पालिकेने लावलेल्या झाडांची चौकशी करायची असेल तर जरूर करावी.

त्याचबरोबर महापालिकेतील तीन वर्षाच्या कारभाराची चौकशी करावी. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. आमचा एकही पदाधिकारी कशातच सापडणार नाही. त्यामुळे तीन वर्षांच्या काय 30 वर्षांच्या कारभाराची चौकशी करावी, असे खुले आव्हान जगताप यांनी राज्य सरकारला दिले आहे.

दरम्यान, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून मोठा प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. अनेक कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे आरोप राष्ट्रवादी, शिवसेनेने केले होते. आता भाजपनेच चौकशीचे आव्हान दिले आहे. त्यानुसार राज्य सरकार चौकशी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like