Pimpri : श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरेल मेजवानी

एमपीसी न्यूज – श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात दिग्गज कलाकारांच्या सांस्कृतीक मेजवानीचे आयोजन करण्यात आले. सुगम संगीत, भावगीत, भक्तीगीत यांच्यामध्ये चिंचवडकर तुडुंब न्हाऊन निघाले. पंडित राहुल देशपांडे यांच्या गायनाने तर प्रेक्षकांच्या सुखाचा अत्युच्च बिंदू गाठला. देशपांडे यांनी सादर केलेल्या नाट्यसंगीत आणि अभंगवाणीमध्ये श्रोते तल्लीन झाले.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित 458 व्या श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात शुक्रवार (दि. 13) ते सोमवार (दि. 16) या कालावधीत रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पाच दिवस झालेल्या या कार्यक्रमांसाठी चिंचवडकरांसह परिसरातील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शुक्रवारी (दि. 13) हर्षद अभिराज, डॉ. राधा मंगेशकर आणि मनीषा निश्चल यांचा ‘नातं तुझं माझं’ हा कार्यक्रम झाला. गीत गायनाच्या माध्यमातून त्यांनी नातेसंबंध, परंपरा, संवेदना यांचे पदर उलगडले. माणसाचं परमेश्वराशी, निसर्गाशी असलेलं नातं या कार्यक्रमात सुगम संगीताच्या माध्यमातून सांगण्यात आले.

शनिवारी (दि. 14) दुपारी विविध भजनी मंडळांनी भजन सेवा सादर केली. रात्री मुग्धा वैशंपायन, सुरंजन रघुनाथ यांच्या सुगम संगीताची मैफिल झाली. वाद्यवृंदांच्या साथीने या सुगम संगीताच्या मैफिलीला चार चाँद लागले. अभंग, गणपती, विठ्ठल, कृष्ण भक्तीची गाणी यामध्ये सादर झाली. ईश्वराची आराधना ही अत्यंत मोहक आणि तेवढीच गंभीर संकल्पना आहे. ईश्वराशी मानवी आत्म्याचा संवाद झाल्यास जीवन सुकर होते, याचा प्रत्यय त्यांनी सुगम संगीतातून सादर केला.

रविवारी (दि. 15) दुपारी विविध भजनी मंडळांनी भजन सेवा सादर केली. चिंचवडकरांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन झाले. निवृत्ती महाराजांनी त्यांच्या खास शैलीत उपस्थितांच्या डोळ्यात वास्तविकतेचे व ईश्वर भक्तीचे अंजन घातले. यानंतर पंडित राहुल देशपांडे यांच्या नाट्यसंगीत आणि अभंगवाणीचा सुरेल कार्यक्रम झाला. शास्त्रीय गायनंतर श्रोत्यांच्या आग्रहाने त्यांनी ‘सूर निरागस हो, घेई छंद मकरंद’ ही गाणी सादर केली.

फेब्रुवारी 2020 मध्ये राहुल देशपांडे यांचे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहे. त्या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांनी संगीत दिले आहे. त्यातील एक गीत त्यांनी प्रथमच श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात सादर केले. या गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या आजोबांच्या स्मृतींना उजाळा दिला.

सोमवारी (दि. 16) दुपारच्या वेळी विविध भजनी मंडळांनी त्यांची भजन सेवा सादर केली. सिद्धकला भजनी मंडळ-कलावती माता यांनीही भजन सेवा दिली. सायंकाळी श्री मोरया जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यानंतर प्रसिद्ध तबला वादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांचा ‘मेलोडिक ऱ्हिदम’ हा कार्यक्रम झाला. त्यांना पंडित अतुल उपाध्याय (व्हायोलिन), तन्मय देवचके (हार्मोनियम), शीतल कोलवलकर (कथ्थक) आणि नागेश आडगावकर (गायन) यांनी साथसंगत केली. विविध राग आणि छंद त्यांनी यावेळी सादर केले. मेलोडिक ऱ्हिदम या कार्यक्रमात सर्वच कलाकारांनी उपस्थितांना भूरळ घातली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.