Pimpri: सभागृह नेते एकनाथ पवार यांचा तडकाफडकी राजीनामा!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते एकनाथ पवार यांनी अनपेक्षितपणे तडकाफडकी राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती पवार यांनीच आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली. महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा सुपुर्त केला आहे. स्वखुशीने पक्ष संघटनेच्या कामासाठी राजीनामा दिल्याचे पवार यांनी सांगितले.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. भाजपची सत्ता येताच निष्ठावान आणि जुने कार्यकर्ते असलेल्या पवार यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली होती. त्यांना तीन वर्षाचा कार्यकाळ मिळाला. विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल झाले. शहराध्यक्षपद भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे केले. त्यानंतर भाजपमधील अंतर्गत राजकीय घडामोडींना कलाटणी मिळाली. त्यातच अनपेक्षितपणे पवार यांनी आज तडकाफडकी सभागृह नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर एकनाथ पवार म्हणाले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मला यापुढील काळात या पदावर न राहता संघटनेच्या कामात अधिक रस आहे. अशी विनंती त्यांना केली. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. आता संघटनेचे काम करणार आहे. कोणाच्या दबावाखाली राजीनामा देत नाही. पदावर असताना अनेक बंधने येत होती. आता अधिक जोमाने पक्षासाठी काम करणार आहे. माझा उत्ताराधिकारी चांगलाच असेल. पदावर असताना शहराचे हिताचे निर्णय घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.