Pimpri: उद्योगनगरीतील कष्टकरी, माथाडी कामगारांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य केंद्र; राज्यातील पहिलाच उपक्रम

कामगार नेते, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांची माहिती; आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'मजदूर हेल्थकार्ड'चे होणार वाटप

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने उद्योगनगरीतील कष्टकरी माथाडी कामगार व त्यांच्या परिवाराकरिता मोफत आरोग्य उपचार केंद्राची सोय उपलब्ध केली जाणार आहे. या उपक्रमामध्ये सुमारे सात हजार माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांची मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत. या तपासण्या करण्यासाठी कामगारांना जुन महिन्यात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोफत ‘मजदूर हेल्थकार्ड’चे वाटप केले जाणार असल्याची माहिती कामगार नेते, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष इरफान सय्यद यांनी आज (शुक्रवारी)पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रात प्रथमच माथाडी कामगारांसाठी राबविला जाणारा हा अभिनव उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी, मोरवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, सहसचिव प्रवीण जाधव उपाध्यक्ष खंडू गवळी, भिवाजी वाटेकर, आप्पा कौंदरे, प्रदीप धामनकर, संदीप मधुरे, ज्ञानोबा मुजूमले, आबा मांढरे, बांगर मामा, पांडूरंग काळोखे, संतिश कंठाळे, गोरक्ष दुबाले, राजू तापकीर, बाबासाहेब पोते, अभय म्हात्रे, अशोक साळुंखे, समर्थ नाईकवाडे, बबन काळे, उद्धव सरोदे, बळीराम कंठाळे, ज्ञानदेन पाचपूते, प्रभाकर गुरव, मारुती वाळूंज, ज्ञानेश्वर घनवट, विजय खंडागळे, चंद्रकांत पिंगट, डॉ. समिर देशमुख, डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. महेश शेटे, डॉ. सुभाष निकम, डॉ. देविराज पाटील उपस्थित होते.

  • इरफान सय्यद म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक, कामगारांची नगरी म्हणून ओळख आहे. राज्याच्या कानाकोप-यातून नागरिक शहरात आपल्या उदरनिर्वाहासाठी येतात. मिळेन ते काम करतात. असंघटित, माथाडी कामगार कष्टाचे काम करतात. कामगार आजारी पडल्यास उपचारासाठी त्यांच्याकडे अधिकचे पैसे नसतात. त्यामुळे कष्टकरी कामगार त्याकडे दुर्लक्ष करतात. उपचार घेत नाहीत. त्यांना वेळेत उपचार मिळत नाहीत. परिणामी, आजार बळावतो. त्यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळावेत यासाठीच महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने कष्टक-यांसाठी आणि त्यांच्या परिवाराकरिता आरोग्य उपचार केंद्राची सोय उपलब्ध केली जाणार आहे”.

”माथाडी कामगार आणि त्यांच्या परिवाराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हा उपक्रम शहरात घेणे आवश्यक होते. त्यादृष्टीने महाराष्ट्र मजदूर संघटनेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमामध्ये सुमारे सात हजार माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांच्या मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत. या तपासण्या करण्यासाठी लवकरच ‘हेल्थकार्डचे’ वाटप केले जाणार आहे. हेल्थकार्डसाठी कामगारांकडून एक रुपयाही शुल्क घेतले नाही. त्यानंतर लवकरच आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याचे” सय्यद यांनी सांगितले.

  • ”माथाडी, असंघटित कामगारांना या उपक्रमाचा लाभ घेता येईल. रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार मोफत केले जाणार आहेत. त्यापुढील आजारासाठी नाममात्र शुल्क आकरण्यात येईल. शहरातील नामांकित कंपन्यांनी साथ दिल्यास ‘सीएसआर’च्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिल्यास संपुर्णपणे उपचार मोफत देखील केले जातील. हा उपक्रम सध्या पुणे जिल्ह्यातील कामगारासांठी सुरु केला आहे. जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाल्यास राज्यभरात हा उपक्रम राबविण्याचा आपला मानस” असल्याचेही सय्यद यांनी सांगितले.

बाळासाहेब शिंदे म्हणाले, ”आजपर्यंत कोणत्याही कामगार संघटनेला, कामगार नेत्याला ही संकल्पना सुचली नव्हती. महाराष्ट्र मजदूर संघटनेने कामगारांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मोफत आरोग्य केंद्र हा उपक्रम सुरु केला आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. कष्टक-यांची सेवा करण्यासाठी अनेक डॉक्टरांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

  • डॉ. सुभाष निकम म्हणाले, ‘मजदूर हेल्थकार्ड’ची एका वर्षाची मुदत आहे. त्या कार्डवर माथाडी, असंघटीत कामगार, त्यांच्या कुटुबांतील सर्व सदस्यांवार प्राथमिक उपचार मोफत केले जातील. हेल्थ कार्डचे एका वर्षानंतर नुतनीकरण केले जाणार आहे. गंभीर आजारावर अल्पदरात उपचार केले जाणार आहेत’.

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व माथाडी कामगारांनी मोफत आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा. आरोग्य कार्ड मिळविण्यासाठी 9960633888/ 8888657593 या मोबाईल क्रमांवर संपर्क साधावा. अथवा चिंचवड शाहूनगर, येथील महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन नोंदणी करण्याचे आवाहन इरफान सय्यद यांनी केले आहे.

  • या परिसरात असणार आरोग्य केंद्रे!
  • रूपीनगर, चिखली, म्हेत्रेवस्ती, नाशिकफाटा, संत तुकारामनगर, उर्से, नाणेकरवाडी अशा विविध परिसरामध्ये या आरोग्य उपचार केंद्राची सोय करण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रात कामगारांच्या ह्रदयरोग, किडणी, हाडांचे व मनक्याचे आजार, कान, नाक घसा, नेत्ररोग, लहान मुलांचे आजार अशा विविध तपासण्या केल्या जाणार आहेत. या मोफत आरोग्य उपचार केंद्रासाठी मोरया क्लिनिक,सत्यम क्लिनीक,साई क्लिनीक, कृष्णा क्लिनीक, पवना हॉस्पीटल तळेगावदाभाडे, आयकॉन हॉस्पिटल, युनिकेअर हॉस्पिटल, ओमसाई हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. मेगाव्हिजन डायग्नोस्टिक यांच्या सौजन्याने अल्पदरात सोनोग्राफी, सिटी-स्कॅन, एमआरआय, एक्स-रे, टु-डी इको, सोनोग्राफी केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.