Pimpri : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून एकावर कोयत्याने वार

Pimpri: A man was attacked with Sharp weapon after he lodged a complaint with the police

एमपीसी न्यूज – महिलेसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका व्यक्तीला त्याच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. याबाबत व्यक्तीने पिंपरी पोलिसात अदखलपात्र तक्रार नोंदवली. पोलिसात तक्रार नोंदवल्याने चार जणांनी मिळून तक्रारदाराच्या डोक्यात कोयत्याने वार केला आणि त्याच्या मुलालाही मारहाण केली. तर अन्य चार जणांनी दोघांना शिवीगाळ केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) दुपारी भीमनगर, पिंपरी येथे घडली.

विजय रतन इंगवले (वय 50, रा. भीमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन शिवाजी सुर्वे, लक्ष्मण शिवाजी सुर्वे, आदिनाथ राम सुर्वे, रोहित राकडे, शीतल सचिन सुर्वे, पल्लवी अशोक रोकडे, शोभा अशोक रोकडे, पल्लवी रोकडे यांची बहीण (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंगवले यांचा मुलगा आणि एका महिलेचे भांडण झाले. त्यावरून आरोपी सचिन, शीतल आणि शोभा यांनी इंगवले यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली. त्याबाबत इंगवले पिंपरी चौकीत तक्रार देण्यासाठी गेले. शुक्रवारी दुपारी सव्वादोन वाजता इंगवले तीन आरोपींविरुद्ध अदखलपात्र तक्रार देऊन घरी निघाले.

त्यावेळी सर्व आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले. ‘आमच्याविरोधात तक्रार देतो का. तुला लय माज आला आहे का. तुझे आतडेच बाहेर काढतो’ असे म्हणून आरोपी सचिन याने इंगवले यांच्या डोक्यात कोयत्याने मारले. ही भांडणे सोडविण्यासाठी इंगवले यांचा मुलगा आला असता आरोपी लक्ष्मण, आदिनाथ आणि रोहित यांनी इंगवले पिता पुत्राला लाकडी दांडक्याने मारहाण केली. अन्य आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like