Pimpri: महापालिकेच्या एका प्रकल्पास दत्ताकाका साने यांचे नाव देणार

Pimpri: A municipal project will be named as Dattakaka Sane सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन त्या संदर्भात निर्णय घेऊन कार्यवाही केली जावी अशी विनंती त्यांनी महापौरांना केली.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने हे सक्रिय नगरसेवक होते. जनतेच्या कामासाठी ते नेहमी अग्रेसर असत अशा त्यांच्या आठवणींना उजाळा देत पालिकेच्या एका प्रकल्पास साने यांचे नाव दिले जावे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत केली. त्यावर कोणत्या प्रकल्पाला दत्ताकाकांचे नाव द्यायचे हे गटनेत्यांची बैठक घेऊन निश्चित केले जाईल, असे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड पालिकेची प्रथमच सोमवारी ऑनलाइन सभा आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलैला कोरोनामुळे निधन झाले आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी दत्ताकाकांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सोमवारची सभा 20 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

नगरसेवक दत्ताकाका साने हे सक्रिय नगरसेवक होते. पालिकेच्या एका प्रकल्पास त्यांचे नाव दिले जावे. ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी मागणी माजी सभागृह नेते एकनाथ पवार व उपमहापौर तुषार हिंगे यांनी सभागृहात केली.

त्यास सभागृह नेते नामदेव ढाके यांनी अनुमोदन दिले. सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन त्या संदर्भात निर्णय घेऊन कार्यवाही केली जावी अशी विनंती त्यांनी महापौरांना केली. त्यास महापौर उषा ढोरे यांनी अनुमती दिली.

ढाके, पवार, हिंगे, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेचे राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, माजी महापौर राहुल जाधव तसेच काही नगरसेवकांनी दत्ताकाका साने यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना श्रद्धांजली वाहिली.

शहरात कोरोनामुळे महापालिका नगरसेवकांसह माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिकांचा मृत्यू होत आहे. ही शहरासाठी गंभीर बाब आहे, असे मत व्यक्त करत नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. त्यांना चांगले उपचार मिळावेत, अशी विनंती राजू मिसाळ यांनी महापौरांकडे केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.