Pimpri : वाटसरूने प्रसंगावधान दाखवल्यामुळे गटारात अडकलेल्या म्हशीचे वाचले प्राण

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीवर जाळी नसल्याने गटारीत म्हैस पडली. बराच वेळ प्रयत्न करूनही तिला बाहेर पडता आले नाही. उलट ती जास्तच फसली. रस्त्याने जाणा-या वाटसरूने याबाबतीत प्रसंगावधान दाखवून अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. अग्निशमन विभाग, पोलीस आणि मेट्रोच्या क्रेनच्या मदतीने म्हशीला गटारा बाहेर काढून वाचवण्यात आले. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री साडेबाराच्या सुमारास वल्लभनगर येथे घडली.

जितू शिरवानी हे रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कासारवाडीवरून पिंपरीकडे जात होते. ते वल्लभनगर येथील अंडरपास जवळ आले असता रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या गटारीत म्हैस बसल्याचे दिसले. सुरुवातीला त्यांना म्हैस बसली असल्याचा अंदाज आला. पण, तरीही त्यांनी थांबून म्हशीला निरखून पहिले. तर म्हैस चक्क गटारीत अडकून पडली होती. ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होती, पण ती जेवढा प्रयत्न करायची , तेवढीच ती आणखीन अडकत होती. तिची ही हालचाल शिरवानी यांच्या लक्षात आली.

जितू शिरवानी यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच संत तुकारामनगर मुख्य केंद्राचा एक बंब आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, स्थानिक पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळ प्रयत्न केला. मात्र, म्हैशीला काढण्यात त्यांना यश येईना. शेवटी बाजूलाच सुरु असलेल्या मेट्रोच्या संबंधितांशी बोलून तिथल्या क्रेनच्या मदतीने म्हशीला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

जितू शिरवानी यांनी म्हशीला बाजूला काढल्यानंतर गटारीवर जाळी नसल्याची महापालिकेच्या ‘सारथी’ हेल्पलाईनकडे तक्रार केली. तसेच गटारीवर जाळी बसवण्याची मागणी केली. तसेच आसपासच्या परिसरात पथदिवे नसल्याचेही त्यांनी ‘सारथी’ला सांगत पथदिवे देखील बसवण्याची मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.