Pimpri : केरळमधील स्वयंसेवक सदानंदन मास्टर यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे मी माझे अहोभाग्य समजतो. केरळच्या भूमीत ज्यांनी देशासाठी समर्पण केले त्यांना हा पुरस्कार मी समर्पित करतो. हा पुरस्कार मला शेवटपर्यंत देशासाठी संघर्ष करण्याचे बळ देईल, असा विश्वास केरळ येथील शिक्षक सदानंदन मास्टर यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून निगडी-प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने यावर्षीच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार’ सदानंदन मास्टर यांना तर राज्यस्तरीय पुरस्कार गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या जनसंघर्ष समितीला प्रदान करण्यात आला. यावेळी सदानंद मास्टर बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ, बडवे इंजिनीअरिंगचे कार्यकारी संचालक श्रीकांत बडवे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नायर, कार्याध्यक्ष भास्कर रिकामे, सचिव प्रदीप पाटील, सह सचिव रमेश बनगोंडे, कोषाध्यक्ष अनंत पिंपुडे इतर सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रमाणेच राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रसेवा हे व्रत घेऊन सेवाप्रकल्प, धर्मरक्षण, राष्ट्रहित, शौर्य आदी क्षेत्रांत भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना निगडी-प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने दरवर्षी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते. राष्ट्रीय पुरस्कारासाठी रुपये एक लाख व स्नमानचिन्ह तर राज्यस्तरीय पुरस्कारसाठी रुपये एक्कावन्न हजार व स्नमानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.

सत्काराला उत्तर देताना सदानंदन मास्टर म्हणाले, “केरळ पूर्वीपासून कम्युनिस्टांचे शक्तिकेंद्र असून समाजातील देशभक्ती व्यक्त करणारे अनेक घटक कम्युनिस्टांच्या हिंसाचाराचे बळी ठरले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे मी माझे अहोभाग्य समजतो. केरळच्या भूमीत ज्यांनी देशासाठी समर्पण केले त्यांना हा पुरस्कार मी समर्पित करतो. हा पुरस्कार मला शेवटपर्यंत देशासाठी संघर्ष करण्याचे बळ देईल ” अशा भावना व्यक्त केल्या.

जनसंघर्ष समिती, नागपूरचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी पुरस्काराला उत्तर देताना म्हटले की, सरकारची असमर्थता आणि नक्षलवाद्यांच्या आणि माओवाद्यांच्या धमक्या अशा भयग्रस्त पार्श्वभूमीवर आमचे काम चालते. संवाद आणि विकास यातून निश्चितच परिस्थिती बदलेल; तसेच संघर्ष करताना सावरकरांच्या कार्यस्मृती आमच्या सोबत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुहास हिरेमठ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन चरित्राची उपस्थितांना आठवण करून दिली. प्रत्येकाने त्यांचे चरित्र वाचले पाहिजे असे आवाहन केले. देशभक्ती ही रोज करण्याची गोष्ट असून ती आपल्या दैनंदिन जीवनातून प्रतिबिंबित व्हायला हवी असे ते म्हणाले. श्रीकांत बडवे यांनी सदानंद मास्टर व जनसंघर्ष समितीच्या कार्याला सलाम करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारती (पिंपरी-चिंचवड) निर्मित ‘अनंत मी – अवध्य मी’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्रापर संगीत, नाट्य व नृत्य सादरीकरणाने झाली. दरम्यान पुरस्कार प्राप्त सदानंदन मास्टर आणि जनसंघर्ष समितीच्या कार्याचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफित दाखवण्यात आली. तसेच आत्तापर्यंत वितरीत केलेल्या बारा पुरस्कार विजेत्यांची ओळख चित्रफितीच्या माध्यमातून करून देण्यात आली.

विश्वनाथ नायर यांनी स्वागत केले. भास्कर रिकामे यांनी आपल्या प्रास्ताविकात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या कामाचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या संयोजनात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. संजय भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप पाटील यांनी आभार मानले. ‘वंदे मातरम्…’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.