Pimpri: स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपतर्फे संतोष लोंढे यांचा अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या संतोष लोंढे यांचा अर्ज आज (सोमवारी) दाखल करण्यात आला आहे.  स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांची निविड निश्चित मानली जात आहे. त्यावर अधिकृतरित्या शुक्रवारी (दि.6) शिक्कामोर्तब होईल. लोंढे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सुवर्णा बुर्डे आणि अनुमोदक म्हणून राजेंद्र लांडगे यांची स्वाक्षरी आहे.

यावेळी महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, मावळते स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, माजी महापौर राहुल जाधव, भीमाबाई फुगे, नगरसेवक कुंदन गायकवाड उपस्थित होते.

महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे. त्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब होईल.

  • शुक्रवारी होणार निवडणूक!
    पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली आहेत. 6 मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.