Pimpri: निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या दोन महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन

A two-month-old baby has been revived after being hit by a nisarga cyclone

एमपीसी न्यूज – पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र येथे निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या चासकमानमधील दोन महिन्याच्या बाळावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी या बाळाला जीवनदान दिले आहे. त्याला सामान्य वार्डमध्ये हलवले असून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणासह पुणे जिल्ह्यालाही मोठी झळ बसली आहे. यात अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. यात चासकमान येथे एक दुर्दैवी घटना घडली. वादळापासून सुरक्षित राहण्यासाठी एक कुटुंब आपल्या घराची दारे-खिडक्या बंद करून वादळ जाण्याची वाट पाहत होते.

घरात पत्र्याच्या साहाय्याने घराला आधार देणाऱ्या लोखंडी रॉडला कापडी झोळी बांधून त्यात दोन महिन्याच्या बाळाला झोपवले होते. प्रचंड पाऊस व सोसाट्याचा वारा वाहत होता.

या वाऱ्यामुळे घराचे छतासह लोखंडी रॉड उचकटला व वाऱ्याबरोबर उडून गेला. सोबतच झोळीत असणारे बाळ ही सुमारे वीस फूट उंचावर फेकले गेले व प्रचंड वेगाने जमिनीवर आदळले.

छत व लोखंडी रॉड बाळाच्या बाजूला पडल्यामुळे ते थोडक्यात बचावले. परंतु परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे तात्काळ या बाळाला मंचर येथील रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात पाठविण्यात आले.

या रुग्णालयातील बालरोग विभागाने या बाळावर त्वरित उपचार सुरू केले. बाल मेंदुरोग तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ कुलकर्णी यांनी बाळाची तपासणी केली. बाळाला उलटी होत होती.

हलके झटके येत असल्याने एक्स-रे व एमआरआय तसेच इतर तपासण्याद्वारे असे दिसून आले की बाळाची कवटी फ्रॅक्चर झाली असून मेंदूला हादरा बसल्याने त्याला इजा झाली आहे. मात्र, शरीरातील इतर अवयवांना कुठे इजा व दुखापत नव्हती.

कवटी फ्रॅक्चर व मेंदूतील इजा झाल्यामुळे बाळाला डॉ. मनोज कुमार पाटील व सहकारी यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे पाच दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. बाळाने या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

तसेच या चिंताजनक स्थितीतून बाळास बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. बाळाच्या पुन्हा सर्व तपासण्या केल्या असून आरोग्याबाबत कोणतेही दोष आढळले नाही.

हे बाळ सुखरूप आहे. त्याला सामान्य वार्डमध्ये हलवले असून लवकरच त्याला डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

ही दुर्दैवी घटना कुटुंबांच्या डोळ्यादेखत घडल्याने या बाळाचा संपूर्ण परिवार आई-वडील आजी, आजोबा हे धास्तावलेल्या व घाबरलेल्या स्थिती होते. त्यामुळे त्यांचे समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार देण्यात आला आहे.

बाळावरील सर्व उपचार हे अत्यल्प दरात करण्यात आले अशी माहिती बालरोग विभागाच्या युनिट प्रमुख डॉ. शैलजा माने यांनी दिली.

मंचर येथील डॉ. कैलास धायबर यांनी वेळेच प्रथमोपचार केल्याने आम्हाला पुढील उपचार करण्यास यश मिळाले, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.