Pimpri : प्रसंगावधान दाखवत मिक्सरमधील पाण्याने पेटलेली कार विझवली!

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारने अचानक पेट घेतला. शेजारीच थांबलेल्या सिमेंट मिक्सरमधील पाणी टाकून तात्काळ आग विझवण्यात आली. वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा धोका टळला आहे. ही घटना आज, शुक्रवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाजवळ घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपअभियंता सुनीलदत्त लहू नरोटे यांच्याकडे हुंडाई कंपनीची आय 20 (एम एच 14 / एफ एम 7119) ही कार आहे. त्यांनी त्यांची कार आज, शुक्रवारी पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालय इमारतीजवळ गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पार्क केली. या ठिकाणी अनेक वाहने नियमितपणे पार्क केली जातात.

नरोटे यांच्या कारने आज दुपारी साडेपाचच्या सुमारास अचानक पेट घेतला. इंजिनमधून धूर येऊ लागला. दरम्यान, पालिका मुख्यालयाजवळ सुरू आहे. या कामावर असलेल्या मिक्सरमधील पाणी कारवर मारून तात्काळ आग विझवण्यात आली.

परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत आग विझवल्याने मोठा धोका टळला आहे. मात्र, कारच्या डाव्या बाजूचा काही भाग जळाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.