Pimpri : ‘आप’ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाही लढणार – दुर्गश पाठक

AAP will also contest local body elections in Maharashtra - Durgash Pathak ; निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहावे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी दुर्गश पाठक यांनी दिली आहे. आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याची सूचना त्यांनी केली आहे.

आम आदमी पक्षाद्वारे आयोजित ऑनलाइन मेळाव्यात पाठक बोलत होते. या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ‘आप’ स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकीत जोमाने उतरणार असल्याचे स्पष्ट केले.

पाठक म्हणाले, आगामी काळातील नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महापालिका निवडणूक आप लढणार आहे.

त्यासाठी राज्य समिती बरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, किशोर मंध्यान, धनंजय शिंदे, प्रीती मेनन व अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’ने कंबर कसली आहे.

2022 मध्ये होणाऱ्या मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर महापालिका देखील ‘आप’च्या रडारवर असल्याचे दुर्गेश पाठक यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेवर ‘आप’चे विशेष लक्ष असणार असून महापालिकेच्या माध्यमातून दर्जेदार सेवा पुरवणार असल्याचे पाठक यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या भूमीत अनेक राजकीय पक्षांनी सत्ता अजमावली, परंतु, ते सामान्य नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले.

राज्यातील मतदारांना आम आदमी पक्ष पर्याय म्हणून समोर येत असून तो आता निवडणुकीच्या रिंगणात सक्षमपणे उतरणार असल्याचे पाठक यांनी या मेळाव्यात सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.