Pimpri: युजीसी विरोधात ‘आप’ची ऑनलाइन निषेध सभा

Pimpri: AAP's online protest rally against UGC देशभरातील परीक्षा सप्टेंबरपर्यंत घेण्यात याव्यात, असे युजीसीने जाहीर केले. त्यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शनांमध्ये अंतर्विरोध आहे.

एमपीसी न्यूज – विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने (युजीसी) जाहीर केलेल्या निर्देशाच्या विरोधात आम आदमी पार्टीची विद्यार्थी आघाडी असलेल्या छात्र युवा संघर्ष समिती तसेच ‘आप’ युवा आघाडीच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाइन निषेध सभा’ आयोजित करण्यात आली.

देशभरातील परीक्षा सप्टेंबरपर्यंत घेण्यात याव्यात, असे युजीसीने जाहीर केले. त्यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शनांमध्ये अंतर्विरोध आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर असताना युजीसी परीक्षा घ्यायचा हट्ट करत आहे.

अशा परिस्थितीत जर परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे आपल्याला केरळमध्ये घडलेल्या घटनेवरून लक्षात येतं. एवढेच नव्हे तर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा स्थळी पोहोचणे कितपत शक्य आहे हे देखील युजीसीने तपासले पाहिजे.

ऑनलाइन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे. खेड्या-पाड्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने परीक्षा देणे अशक्य होणार आहे. युजीसीचे शैक्षणिक धोरण हे फक्त परीक्षा-केंद्रित आहे का असा सवाल छात्र युवा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष साहिल पार्सेकर यांनी या निमित्ताने उपस्थित केला.

युजीसीच्या या निर्देशामुळे शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅम्पस प्लेसमेंटची चिंता सतावत आहे. जोपर्यंत मार्कशीट येत नाही तोपर्यंत त्यांचे प्लेसमेंट टांगणीवर पडले आहे.

यासोबतच मार्कशीटवर ‘कोविड बॅच’ असा उल्लेख काही महाविद्यालयांनी केला होता, त्याबाबतही विद्यार्थी चिंतेत आहेत असे ‘आप’ युवा आघाडीच्या वतीने चेतन बेंद्रे यांनी मांडले.

युजीसीच्या या हट्टामुळे विद्यार्थ्यांना तणावातून जावे लागत आहे. युजीसीने वेळीच निर्णय घेऊन देशभरातील परीक्षा रद्द कराव्यात आणि विद्यार्थ्यांचा मनस्ताप संपवावा अशी मागणी या ऑनलाइन निषेध सभेत करण्यात आली.

यावेळी छात्र युवा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष साहिल पार्सेकर, ‘आप’ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, मुंबई स्टुडंट कलेक्टिव्हच्या साम्या कोरडे, ऊर्जा दोशी, चेतन बेंद्रे, पालक संजय ठक्कर, तसेच विद्यार्थी आदींनी मनोगते व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.