Pimpri: महापालिकेचे पाच लाखांपुढील थकबाकीदारांना अभय; तब्बल चार हजार थकबाकीदार!

थकबाकीदारांची माहिती देण्यास स्मिता झगडे यांची टाळाटाळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून शहरातील पाच लाखांपुढील थकबाकीदारांना अभय दिले जात असल्याचे समोर आले आहे. निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या मालमत्तांचा तब्बल चार हजार जणांनी कर थकविला आहे. थकबाकीदारांची माहिती देण्यास वादग्रस्त अशी ओळख असलेल्या विभागाच्या प्रमुख स्मिता झगडे टाळाटाळ करत आहेत. त्यांच्याकडून थकबाकीदारांना अभय दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे पाच लाख सहा हजार 927 मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. 16 कर संकलन विभागीय कार्यालयातर्फे कर वसूल केला जातो. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कर संकलन विभाग आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) बंद झाल्यामुळे महापालिकेची मदार मालमत्ताकरावरच अवंलबून आहे. असे असताना कर संकलन विभागाकडून तब्बल पाच लाखांपुढील थकबाकीदारांना अभय दिले जात आहे.

पाच लाखांपुढील 3 हजार 733 थकबाकीदारांनी कराचा भरणा केला नाही. त्यामध्ये निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागांचे मालमत्ताधारक आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा कर थकला आहे. तरी, देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांना विभागाच्या प्रमुख स्मिता झगडे यांच्याकडून अभय दिले जात असल्याचे आरोप होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

थकबाकीदारांची माहिती देण्यास वादग्रस अशी ओळख असलेल्या झगडे यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. सत्ताधा-यांनी निष्क्रियतेचा ठपका ठेवलेल्या स्मिता झगडे यांच्यावर आयुक्तांनी मेहरबानी दाखवत त्यांच्याकडे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेला करसंकलन विभाग सोपविला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्मिता झगडे आणि वाद…..
महापालिकेत रुजू झाल्यापासून झगडे विविध कारणांनी वादग्रस्त ठरल्या आहेत. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे यांनी झगडे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले होते. स्मिता झगडे या निष्क्रीय असल्याचा आरोप करत त्यांना राज्यसेवेत परत पाठविण्याची मागणी जैवविविधता समितीच्या सभापती उषा मुंडे यांनी केली होती.

सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनीही क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांचे ‘ग’ प्रभागाकडे लक्ष नसल्याचा आरोप करत कार्यालयाच्या आवारात कचरा फेकला होता. तसेच झगडे या निष्क्रिय अधिकारी आहेत. त्यांना कामकाज व्यवस्थितपणे हाताळता येत नाही. आजपर्यंत त्यांना प्रभागातील कोणतीही समक्षा सक्षमपणे हाताळता आली नाही. त्यांना मुख्यालयातून प्रभागातील समस्या पाहण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांचे प्रभागाकडे लक्ष नसल्याचा आरोपही वाघेरे यांनी केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.