Pimpri: बक्षीस पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारा – मंगला कदम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष येऊन अर्ज जमा करणे अशक्य आहे. : Accept the online application of the meritorious students eligible for the prize - Mangala Kadam

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत दहावीतील 80 टक्यांहून अधिक गुण घेणा-या विद्यार्थ्यांचा बक्षिस देऊन सत्कार केला जातो. त्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष येऊन अर्ज जमा करणे अशक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात यावेत, अशी मागणी माजी महापौर, राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने महापालिकेने 2013 पासून बक्षीस योजना सुरु केली आहे.

त्यानुसार महापालिकेतर्फे 80 टक्यांहून अधिक गुण घेणा-या विद्यार्थ्यांचा बक्षिस देऊन सत्कार केला जातो.

90 टक्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांला 1 लाख, 85 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या 50 हजार रुपये आणि 80 टक्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला 25 हजार रुपये देऊन गौरविण्यात येते.

त्यासाठी नागरवस्ती विभागाकडून अर्ज व त्याबरोबर अनुषंगीक कागदपत्रे मागवली जातात. सध्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

रोज एक हजाराच्या जवळपास कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झाली आहे.

सप्टेंबरमध्ये सुद्धा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

त्यामुळे विद्यार्थी अर्ज आणि कागदपत्रांसाठी धावपळ करुन अर्ज जमा करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रामध्ये गर्दी करतील.

त्यामुळे कोरोना संसर्ग होऊन कोरोना बाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे दहावीच्या 80 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थ्यीनींना बक्षीस रक्कमेचे अर्ज, आवश्यक असणारी कागदपत्रे ऑनलाईन स्वीकारावीत.

त्याकरिता आवश्यक असणारी संगणकीय यंत्रणा तयार करुन अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत. तसेच नागरवस्तीच्या इतर योजनांचे अर्जही योजना जाहीर होतील.

त्याप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अर्ज व कागदपत्रे स्वीकारण्यात यावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.