Pimpri : आरोग्य विभागाच्या मते ‘ही व्यक्ती’ असू शकते ‘कोरोना संशयित’

एमपीसी न्यूज – कोरोना या साथीच्या आजाराचा जलद गतीने होणाऱ्या प्रसारामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य वाटणारा खोकला, ताप आणि श्वास घ्यायला त्रास होणे ही या आजाराची लक्षणे असल्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शेजारी खोकणारा किंवा शिंकलेला कोणीही व्यक्ती कोरोना बाधित किंवा संशयित असू शकतो, असा समज निर्माण झाला आहे. यावर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून माहिती प्रसारीत करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये कोरोना या आजाराचा संशयित व्यक्ती कोण असू शकतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार खालीलपैकी लक्षण असणाऱ्या व्यक्ती कोरोना संशयित असू शकते.

1) तीव्र श्वसनाचा आजार असलेला कोणताही व्यक्ती, ज्याला ताप व श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असल्याचे किमान एक लक्षण आहे. ज्यामध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास यांचा समावेश आहे.

2) कोविड-19 आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वी 14 दिवसादरम्यान ‘कोरोनटाईन’ केलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेली किंवा बाधित देशातून / भागातून प्रवास केला असेल तर ती व्यक्ती संशयित ठरू शकते.

3) कोविड-19 आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वी 14 दिवसांदरम्यान जर श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असलेल्या व निदान झालेल्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असेल तर ती व्यक्ती संशयित ठरू शकते.

4) तीव्र श्वसनाचा आजार असलेला कोणताही व्यक्ती, ज्याला ताप व श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असल्याचे किमान एक लक्षण (खोकला, श्वास घेण्यास त्रास आहे) आणि त्याला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.

5) ज्याची कोविड-19 आजाराची केलेली तपासणी अनिर्णायक ठरली असेल.

6) प्रयोगशाळेमार्फत निदान झालेली व्यक्ती वैद्यकीय चिन्हे आणि लक्षणे असतील किंवा नसतील परंतु प्रयोगशाळेमार्फत एखाद्या व्यक्तीला कोविड-19 ची बाधा झाल्याचे निदान झालेले असेल अशी व्यक्ती.

या आजाराबाबत किंवा स्वतःला होत असलेल्या यापैकी कोणत्याही त्रासाबद्दल संशय किंवा भीती बाळगून न घेता योग्य वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.