Pimpri : पिस्टल खोटे असल्याचे म्हणाल्यावरून तरुणावर गोळीबार करणा-या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल खोटे असल्याचे म्हणणा-या तरुणावर गोळीबार करून पसार झालेल्या आरोपीला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस कर्मचारी महिलेने जागतिक महिला दिनाच्या दिवशी सहा दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडले असल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सनी अशोक परदेशी/रोकडे (वय 27, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुरप्रीत हरदेवसिंग जावंद (वय 22, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मार्च रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास गुरप्रीत हरदेवसिंग जावंद, त्याचा मित्र सिद्धांत सुनील बहोत (वय 21) हे दोघे मिलिंद नगर पिंपरी येथे रिक्षामध्ये बिअर पित गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पोलीस रेकॉर्डवरील आरोपी सनी परदेशी उर्फ रोकडे हा तिथे आला. त्याने त्याच्या खिशातून पिस्तुल काढले. गुरप्रित याने ते पिस्तुल खोटे असल्याचे सांगितले. त्यावरून त्यांच्यामध्ये भांडण झाले. त्यातूनच जीवे मारण्याच्या उद्देशाने सनी याने गुरप्रित याच्यावर गोळी झाडली. ती गोळी गुरप्रित याच्या डाव्या खांद्याला लागली. गुरप्रित याला तात्काळ उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरोपी सनी पसार झाला होता. रविवारी (दि. 8) महिला पोलीस नाईक रमेजा गोलंदाज यांना सनी बाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सनी याला अटक केली. आरोपी सनीकडून गुन्ह्यात वापरलेली लोडेड पिस्टल जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, पोलीस कर्मचारी रमेजा गोलंदाज, श्रीकांत जाधव, सरक, वानखेडे, पिंजरकर, देशमुख यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.