Pimpri : आमदार चाबुकस्वार यांनी मिळविली पाचवी पदवी..!; विधिमंडळातील ठरले सर्वात उच्चशिक्षित आमदार

एमपीसी न्यूज – ज्ञानप्राप्तीला वयाची अट आणि बंधन नसते असे म्हणतात. भारतातील मुक्त शिक्षण पद्धतीमध्ये कोणीही कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकतो. मात्र, राजकारणासारख्या धकाधकीच्या आणि प्रचंड व्यस्तता असलेल्या क्षेत्रात राहून देखील आमदार चाबुकस्वार यांनी नुकतीच पाली भाषेतील एमफिल ही पदवी प्राप्त केली. या पदवीमुळे आता आमदारांच्या पदव्यांची संख्या पाचपर्यंत पोहोचली असून विधिमंडळातील ते सर्वात उच्चशिक्षित आमदार ठरले आहेत.

गेली ३३ वर्षे राजकारणात सक्रीय असलेले ॲड. गौतम चाबुकस्वार हे २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेतर्फे पिंपरी मतदारसंघातून निवडून आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते गेली १२ वर्षापासून आजही अध्यापनाचे काम करतात. आमदार झाल्यानंतर विधिमंडळात शपथ घेताना त्यांनी पाली भाषेला प्राधान्य देत व भारतातील या मूळ भाषेत त्यांनी शपथ घेऊन संपूर्ण राज्याचे लक्ष आपल्याकडे वेधले होते.

  • बी.कॉम, डिप्लोमा इन पाली, एम.ए, एल.एल.बी. आणि एमफील (पाली) अशी त्यांची शैक्षणिक पात्रता झाली असून आता पीएचडी (डॉक्टरेट) साठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या चाबुकस्वार यांनी आपल्या या शैक्षणिक आलेखाबद्दल बोलताना म्हटले की, माझी प्रेरणा व ऊर्जा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून त्यांच्या विचारकार्यानुसार मी राजकारणात राहूनही शिक्षणाची आस याही वयात बाळगून आहे. असे नमूद केले.

आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार म्हणाले की, पाली भाषेत मिळालेली ही पदवी मिळविणारा मी पहिला आमदार आहे. आतापर्यत पाच पदव्या मिळविल्या. त्यात नगरसेवक असताना तीन तर, आमदार असताना दोन पदव्या मिळविल्या. माझे गुरु व प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या विचारानेच मी ही पदवी प्राप्त करु शकलो. त्यात आज गुरुपोर्णिमा शिष्याने गुरुला दिलेली ही अमूल्य भेट आहे. याचा मला आनंद होत. गेल्या अकरा वर्षांपासून मी पुणे विद्यापीठात पाली भाषेचा अभ्यास दर शुक्रवार आणि शनिवारी शिकवित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.