Pimpri: भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कार्यवाही करा; राज्य सरकारचा महापालिकेला आदेश

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली होती तक्रार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांमध्ये  झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांच्या तक्रारींवर उचित कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले आहेत. राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी दिलीप वणिरे यांनी महापालिकेला तसे पत्र पाठविले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार, सल्लागारांचा समावेश आहे. त्यांनी एकत्रितपणे भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली होती. तसेच दोषींवर कारवाई करण्याची देखील मागणी त्यांनी केली होती. या पत्राची दखल राज्य सरकारने घेतली आहे.

भापकर यांनी केलेल्या तक्रारी महापालिकेच्या कार्यवाहीशी संबंधित आहेत. त्याअनुषंगाने उचित कार्यवाही करण्यात यावी. कार्यवाही करून अर्जदारास कळविण्यात यावे, असे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले आहेत. याबाबत राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी दिलीप वणिरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.