Pimpri: अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर महापालिकेकडून धडक कारवाई

एमपीसी न्यूज – शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने धडक कारवाई सुरु केली आहे. अस्वच्छतेत भर घालणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रभागनिहाय कारवाई तीव्र करण्यात आली असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सार्वजनिक ठिकाणी घाण टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघवी करण्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसुली केली जात आहे. यासाठी पालिकेने भरारी पथके नेमली आहेत. महापालिकेने स्वच्छतेच्या तक्रारीबाबत ‘पीसीएमसी हेल्थ अॅन्ड सॅनिटेशन सोल्यूशन’ या नावाने फेसबूक पेज देखील तयार केले आहे. यावर नागरिक स्वच्छतेबाबत तक्रार करतात. त्याची आरोग्य विभागाकडून तातडीने दखल घेतली जात आहे. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेबाबत सुधारणा होत आहे.

अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपरी भाजी मंडई येथे रस्त्यावर खराब झालेला भाजीपाला फेकणा-या 25 भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी 180 रूपये याप्रमाणे एकूण साडेचार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ‘ग’ प्रभाग कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 23 मध्ये कचराकुंडीचा वापर न करता कचरा रस्त्यावर फेकणा-या सात दुकानांना प्रत्येकी अडीचशे रुपये याप्रमाणे एकूण 1750 रुपयांचा दंड करण्यात आला.
वॉर्ड क्रमांक 24 मध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा-या एकास दोनशे तर रस्त्यावर थुंकणा-या पाच जणांना साडेसातशे रुपये, अस्वच्छता पसरविणा-या सात व्यक्तींना मिळून 2 हजार 530 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 28 नागरिकांकडून 10 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

याबाबत मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी धडक कारवाई सुरु केली आहे. अस्वच्छता पसरविणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर देखील धडक कारवाई सुरु केली आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.