Pimpri : रस्त्यावर धूळ खात पडलेल्या वाहनांवर होणार कारवाई

वाहतूक विभाग, महापालिका आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय साधणार समन्वय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात भले मोठे रस्ते झाले. त्यातूनच बीआरटीचे नियोजन झाल्याने बीआरटी मार्ग देखील तयार करण्यात आले. मात्र तयार असलेल्या ज्या बीआरटी मार्गावर बस धावत नाही, त्या मार्गांवर खासगी वाहने धूळ खात पडली आहेत. तसेच प्रशस्त रस्ते बघून नागरिकांनी रस्त्यांच्या बाजूला देखील वाहने लावून ठेवली आहेत. या धूळ खात पडलेल्या आणि दररोज भर रस्त्यात उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे शहरातील रस्ते काहीसे अरुंद झाले आहेत. याचा शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. हे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी महापालिका, वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात उत्तम वाहतूक व्यवस्था करण्यासाठी मागील काही वर्षांपासून विविध स्तरावर नियोजन केले जात आहे. बीआरटी हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मैलाचा दगड बनून पुढे आली. मात्र काही प्रशासकीय प्रक्रिया आणि काही मार्गांवरील काम रखडले असल्याने शहरात सर्वत्र बीआरटी धावण्यास काही विलंब लागत आहे. बीआरटी शहरात सर्वत्र सुरू करण्यासाठी प्रशासनाला न्यायालयीन प्रक्रियांना देखील तोंड द्यावे लागले आहे. दरम्यान शहरातील बहुतांश भागात बीआरटी मार्ग बनून तयार झाले. मार्ग तयार झाले पण बस धावेना त्यामुळे तयार असलेले काही रस्ते मोकळेच राहू लागले. याचाच फायदा घेत मोकळ्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग वाढू लागले.

अनधिकृत पार्किंगचे लोण मोकळ्या रस्त्यासह वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर आणि फूटपाथवर देखील पसरले. अनेक मार्गांच्या बाजूला आणि फूटपाथवर वाहनांसह व्यवसाय देखील सुरू झाले आहेत. काही ठिकाणी गॅरेज, काही ठिकाणी लहान दुकाने, वॉशिंग सेंटर, फळांची दुकाने थाटण्यात आली आहेत. फूटपाथवर पथारीवाले सुद्धा मोठ्या प्रमाणात बसतात. त्यामुळे पादचा-यांनी जायचं कुठून हा प्रश्न बहुतांश मार्गांवर उभा राहतो. फूटपाथवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन सपशेल तोंडावर आपटले आहे. यातूनच पादचारी रस्त्याने चालत जातात आणि त्यात अनेक अपघात देखील होत आहेत.

अण्णासाहेब मगर चौकातून चिखली पोलीस ठाण्याकडे जाणा-या बीआरटी मार्गात तर चक्क रिक्षा फिटिंगचे भले मोठे सर्व्हिस सेंटर सुरु आहे. बहुतांश खासगी कंपन्यांनी कामगारांसाठी बस सेवा सुरु केली आहे. त्यामुळे कंपनीतील अधिकारी आणि कामगारांना त्यांच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांना कंपनीत प्रवेश दिला जात नाही. मात्र आपले रेप्युटेशन टिकवून ठेवण्याच्या भ्रमात अनेकजण वाहने आणतात. तसेच वाहतुकीचे नियम न पाळणा-या वाहन व वाहन चालकानावर कंपनी प्रशासन कारवाई करत आहे. कंपनीमध्ये वाहनांना प्रवेश मिळत नसल्यामुळे ही वाहने कंपनीच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला पार्क केली जातात. अशा वाहनांमुळे देखील रस्ते मोठ्या प्रमाणात झाकले जात आहेत. या वाहनचालकांना कोणी एका शब्दानेही दुखावत नाही.

अनेक ठिकाणी वाहने धूळ खात पडलेली आहेत. त्यातील बरीच वाहने चोरीची असू शकतात. बीआरटी चालू नसल्याची कारणे देत वाहने लावली जात आहेत. पण बीआरटी सुरू होईपर्यंत वाहतूक सुरळीत करण्यासाठी, पोलीस, अग्निशमन दल तसेच आवश्यक त्या गर्दीच्या वेळी हा रस्ता खुला राहू शकतो. शहरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडालेला असतो. अशा वेळी या बीआरटी तसेच धूळ खाणा-या वाहनांनी अडवून ठेवलेल्या रस्त्यांचा उपयोग होऊ शकतो. पण याकडे कोणाचेही लक्ष जात नाही.

सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव म्हणाल्या, “शहरात धूळ खात पडलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबत प्रशासकीय आदेश आले आहेत. बेवारस वाहनांवर १५ दिवस अगोदर नोटीस लावण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका अशी बेवारस वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे ही कारवाई पिंपरी-चिंचवड महापालिका, वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. याबाबत महापौर राहुल जाधव यांनी देखील एक बैठक घेतली आहे. त्यावेळी देखील संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.