Pimpri: अवैध नळजोड धारकांवार आजपासून कारवाई; पालिका फौजदारी गुन्हे दाखल करणार

शहरात सापडले 16 हजार अवैध नळजोड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने राबविलेल्या अनधिकृत नळजोडच्या सर्वेक्षणात शहरात केवळ 16 हजार अवैध नळजोड सापडले आहेत. यापैकी नियमित करण्यासाठी पाच हजार 14 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी पाणीपुरवठा विभागाने दोन हजार 964 अर्ज मंजूर केले आहेत. तथापि, शहरातील अनधिकृत नळजोडची 16 हजार ही संख्या अतिशय नगण्य असून यापेक्षा शहरात अधिक अवैध नळजोड आहेत. दरम्यान, आज (सोमवार) पासून अवैध नळजोड धारकांवार धडक कारवाई केली जाणार असून फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत होत आहे. शहरात अनधिकृत नळजोडचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केले आहेत. त्यामुळे पाण्याची गळती होती. तसेच दूषित पाणीपुरवठा देखील होतो. त्यासाठी महापालिकेने मे महिन्यापासून अनधिकृत नळजोडचे सर्वेक्षण सुरु केले होते. अनधिकृत नळजोड धारकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. तथापि, नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही.

महापालिकेने 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु, या मुदतीत देखील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. सर्वेक्षणात सापडलेल्या 16 हजार चार अवैध नळजोड धारकांपैकी केवळ पाच हजार 14 जणांनी नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी महापालिकेने केवळ दोन हजार 964 अर्ज स्वीकारले आहेत.

पाणीपुरवठा विभागाने केलेल्या सर्वेक्षणात नव्याने निर्माण झालेल्या थेरगाव परिसरातील ‘ह’ प्रभागात सर्वाधिक म्हणजेच पाच हजार 500 अनधिकृत नळजोड सापडले आहेत. त्यापैकी केवळ 157 जणांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले होते. त्यातील 20 अर्ज मंजूर केले आहेत. तर, निगडी, प्राधिकरणाचा परिसर असलेल्या ‘अ’ प्रभागात सर्वाधिक कमी 202 अनधिकृत नळ नळजोड सापडले. त्यापैकी 103 जणांनी नियमित करणासाठी अर्ज केले असून 31 अर्ज मंजूर केले आहेत.

‘ब’ प्रभागात दोन हजार 340 अनधिकृत नळजोड सापडले असून एक हजार 121 जणांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले. त्यातील 694 अर्ज मंजूर केले आहेत. ‘क’ प्रभागात दोन हजार 195 अनधिकृत नळजोड सापडले. त्यापैकी नियमित करण्यासाठी 636 जणांनी अर्ज केले असून त्यातील 100 अर्ज मंजूर केले आहेत. ‘ड’ प्रभागात एक हजार 724 अनधिकृत नळजोड सापडले असून त्यापैकी 443 जणांनी नियमित करण्यासाठी अर्ज केला. त्यातील 175 अर्ज मंजूर केले आहेत.

‘इ’ प्रभागात 967 अनधिकृत नळजोड सापडले असून 418 जणांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले. त्यापैकी 55 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ‘फ’ प्रभागात एक हजार 908 अनधिकृत नळजोड सापडले. त्यापैकी एक हजार 714 जणांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले असून एक हजार 547 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ‘ग’ प्रभागात एक हजार 168 अनधिकृत नळजोड सापडले आहेत. त्यापैकी 422 जणांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले असून 342 अर्ज मंजूर केले आहेत.

‘ह’ प्रभागात सर्वाधिक पाच हजार 500 अनधिकृत नळजोड सापडले आहेत. त्यापैकी केवळ 157 जणांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले होते. त्यातील 20 अर्ज मंजूर केले आहेत. त्यामुळे सर्वाधिक अनधिकृत नळजोड ‘ह’ प्रभागात आहेत. सर्वेक्षणात सापडलेल्या 16 हजार चार अनधिकृत नळजोड धारकांपैकी केवळ पाच हजार 14 जणांनी नियमित करण्यासाठी पालिकेकडे अर्ज केले. त्यापैकी पाणीपुरवठा विभागाने दोन हजार 964 अर्ज मंजूर केले आहेत.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”अवैध नळजोड धारकांवर आजपासून कारवाईला सुरुवात करत आहोत. त्यासाठी पथके तयार केली जाणार आहेत. पथकाच्या माध्यमातून अनधिकृत नळजोड धारकांवार कारवाई केली जाईल. ज्यांचे अनधिकृत नळजोड आहेत आणि ज्यांनी अर्ज भरले नाहीत, असे नळजोड तोडले जाणार आहेत. दोन नळजोड धारकांवर देखील कारवाई केली जाणार असून एक-एक विभाग घेऊन कारवाई केली जाईल. पाण्याची चोरी करणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.