Pimpri: सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांची स्वेच्छानिवृत्ती प्रशासनाने नाकारली!

कोरोनाच्या जनजागृतीसाठी निव्वळ देय रकमेतून 50 टक्के रक्कम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिका-यांवर होत असलेल्या अन्यामुळे विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेला अर्ज प्रशासनाने नाकारला आहे. तुपे यांची प्रशासनाला आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची स्वेच्छानिवृत्ती नाकारली आहे. दरम्यान, तुपे यांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. यापुढील काळातील निव्वळ देय रकमेतून 50 टक्के रक्कम कोरोनाच्या जनजागृतीसाठी त्यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिका-यांवर सातत्याने अन्याय होत आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांना महत्वाचे विभाग दिले जातात. महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाल्याने तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यामध्ये दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी संतोष पाटील आणि अजित पवार हे दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आहेत. असे असताना आता पुन्हा तिसरे अतिरिक्त आयुक्त साहेबराव गायकवाड ही प्रतिनियुक्तीवरील आले आहेत. त्यामुळे स्थानिक अधिका-यांमध्ये प्रचंड नाराजी, असंतोष निर्माण झाला आहे. अधिकारी नाऊमेद झाले आहेत.

स्थानिक अधिका-यांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे महापालिका विद्युत विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांनी 14 जानेवारी 2020 रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रशासनाकडे अर्ज केला होता. स्थानिक अधिका-यांबाबत आजही तीच परिस्थिती आहे. तथापि, प्रशासन विभागाने तुपे यांची स्वेच्छानिवृत्ती नाकारली आहे. महापालिकेला तुपे यांची आवश्यकता असल्याने प्रशासनाने 13 एप्रिल रोजी स्वेच्छानियुक्ती नाकारल्याचे पत्राद्वारे तुपे यांना कळविले होते.

  • कोरोनाच्या जनजागृतीसाठी निव्वळ देय रकमेतून 50 टक्के रक्कम
    जग कोरोनाच्या विषाणुविरोधात लढत आहे. त्यापार्श्वभुमीवर प्रवीण तुपे यांनी पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमार्फत कोरोना विषयक प्रबोधन, जागरुकता, उपाययोजनाकरिता यापुढील काळातील मासिक वेतनाच्या निव्वळ देय रकमेतून 50 टक्के रक्कम दिली आहे. ही रक्कम वेतनातून कपात करावी. सायन्स पार्कला देण्यात यावी. संबंधितांना तसे आदेश द्यावेत, असे पत्र तुपे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे. या निर्णयाबाबत तुपे यांचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.