Pimpri : गृहिणीने पुस्तक रूपाने लिहिले अग्निशमन दलाच्या जवानांचे अनुभव

एमपीसी न्यूज – अग्निशमन दलाच्या जवानांचे काम अत्यंत जोखमीचे असते. जीवाची पर्वा न करता ते आपले काम करतात. त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाबद्दल आपण ऐकतो, पाहतो, काही वेळेला वाचतोही. पण एखाद्या पुस्तकातून त्यांचे अनुभव क्वचितच वाचले असतील. लोणावळा मधील एका गृहिणीने अग्निशमन दलाच्या जवानांचे अनुभव कथन करणारे एक पुस्तक लिहिले आहे. त्याद्वारे महाराष्ट्रातील अग्निशमन दलातील जवानांचे अनुभव आणि त्यांच्या भावना मांडण्यात आला आहेत.

गंजपेठ पुणे येथील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले स्मारक येथे सारिका संतोष पाळेकर यांनी लिहिलेल्या ‘अग्निहोत्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. 9) पार पडला. प्रकाशन सोहळ्यासाठी पुणे महापालिकेचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पुणे महापालिका कामगार युनियन जनरल सेक्रेटरी मुक्ता मनोहर, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, ऋषिकांत चिपाडे, प्रसिद्ध बासरीवादक डॉ. केशवराव गिंडे आदी उपस्थित होते.

लेखिका सारिका संतोष पाळेकर या गृहिणी आहेत. अग्निशमन दलातील जवनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांचे अनुभव सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ‘अग्निहोत्र’ हे पुस्तक लिहिण्याचा अट्टहास केला आहे. आजपर्यंत कधीही अशा प्रकारे कोणत्याही लेखकाने अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रत्यक्ष अनुभव संकलन करून प्रकाशित केलेले नाहीत. सर्व सामान्य नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांच्या व्यथा कळाव्यात, यासाठी लेखिका पाळेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रातील सर्व अग्निशमन विभागाच्या जवानांचे अनुभव ऐकून त्यांनी हे पुस्तक लिहिले.

याविषयी पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे म्हणाले, “अग्निहोत्र पुस्तकाच्या लेखिका पाळेकर अग्निशमन दलाच्या जवानांचे अनुभव ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत होत्या. त्यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या मुख्यालयाला देखील भेट दिली. त्यावेळी मी माझ्या कार्यव्यस्ततेमुळे माझे अनुभव सांगू शकलो नाही. पण माझ्या जवानांनी सांगितलेले अनुभव पुस्तकामध्ये वाचताना आनंद होत आहे. आमच्या भावना समाजासमोर पोहोचत असल्याचाही आनंद होत आहे. यामुळे मला आणि माझ्यासारख्या अनेकांना अशा प्रकारचे लेखन करण्याची प्रेरणा मिळेल”

लिडिंग फायरमन अशोक कानडे आणि फायरमन अमोल चिपळूणकर यांनी त्यांचे अनुभव कथन केले. त्याबद्दल त्यांचा अनाम प्रेम या स्वयंसेवी संस्थेमार्फत पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.