Pimpri: महापालिका प्रशासनाकडूनच ‘सोशल डिस्टन्सिंग’ची ‘ऐशी की तैशी’

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नागरिकांना ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करायला सांगणा-या पिंपरी महापालिका प्रशासनाकडूनच ‘सोशल डिस्टन्सिंग’ची ‘ऐशी की तैशी’ झाली आहे. महापालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या घेतलेल्या बैठकीत ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन केले नाही. बैठकीला सुमारे 70 हून अधिक नागरिक हजर होते.

महापालिकेत रुजू झाल्यापासून सातत्याने वादग्रस्त ठरत असलेले अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांनी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची सोमवारी बैठक बोलविली होती. या बैठकीस मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, बांधकाम परवानगी व अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडडी यांच्यासह सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन ते तीन बैठका एकाचवेळी झाल्या. बैठकीला उपस्थित प्रतिनिधी शेजारी शेआजरीच बसलेले पहायला मिळाले. या बैठकीत ‘सोशल डिस्टन्सिंग’ची ‘ऐशी की तैशी’ केल्याचे पाहायला मिळाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करावे, असे आवाहन पिंपरी महापालिका प्रशासनाकडू सातत्याने केले जात आहे. मात्र, स्वत:कडून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे उल्लंघन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांची बाजू समजताच ती  बातमीमध्ये अपडेट  केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.