Pimpri : आखाड पार्ट्या रंगल्या; मांसविक्रीची दुकाने आणि हॉटेल फुल्ल

एमपीसी न्यूज – श्रावण महिन्यात मांसाहार पाळला जात असल्याने आषाढ महिन्यात मांसाहाराला प्राधान्य दिले जाते. त्यात आषाढ महिन्याचा आज (बुधवारी) शेवटचा दिवस असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल आणि मांसविक्रीची दुकाने फुल्ल झाली आहेत. सर्वत्र आखाड पार्ट्या रंगल्या आहेत.

शहरातील विशिष्ट हॉटेलमध्ये मांसाहाराच्या अनोख्या थाळ्या मिळतात. त्यात रावण थाळी, स्पेशल बिर्याणी, तांबडा-पंधरा रस्सा, चिकन फ्राय, मटण फ्राय, स्पेशल मच्छी अशी विशेषतः दर्शवणारी अनेक हॉटेल आहेत. दररोजपेक्षा आज सर्वाधिक मांसविक्री होते. शेकडो टन मांस आणि मासे आजच्या दिवशी विकले जातात. त्याचबरोबर दारूच्या दुकानांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात स्टॉक करून ठेवला जातो. आजच्या दिवशी दारू दुकानदारांकडून विक्रमी विक्री केली जाते.

शहरात सर्वच हॉटेल फुल्ल झाले आहेत. त्यात पुण्यातील एसपी बिर्याणी हाऊसला दुपारपर्यंत सुमारे अडीच हजार बिर्याणी प्रेमींनी भेट दिली. सर्वांनी बिर्याणीचा आस्वाद घेतला आहे. घरी, कार्यालये, हॉटेलमध्ये आणि अन्य ठिकाणी जाऊन अखंड पार्ट्या केल्या जात आहेत. मांसाहारावर मस्त ताव मारून घेतला जात आहे.

उद्या (गुरुवार) पासून श्रावण महिना सुरु होत आहे. श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याची परंपरा आहे. ही परंपरा बहुतांश जणांकडून जोपासण्यात येते. वर्षभरात सर्वाधिक मांसाहार आषाढ महिन्यात केला जातो. सकाळपासून मांसविक्रीच्या दुकानांवर ग्राहकांनी मोठी गर्दी केली. काही ठिकाणी दुकानदारांनी कामगारांच्या मदतीने ग्राहकांच्या रांगा लावल्या. रांगा लावून मांसविक्री केली गेली. त्याचबरोबर दारूच्या दुकानांमध्ये देखील काउंटरवर संरक्षक जाळी जाऊन दारूची विक्री केली जात आहे.

श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याबाबत अनेक शास्त्रीय आणि अध्यात्मिक करणे सांगितली जातात. निसर्गाला नवी पालवी फुटलेली असते. याच महिन्यात अनेक प्राण्यांचा प्रजननाचा काळ सुरु होतो. एका जीवासोबत त्यांच्या कोवळ्या जीवांचा बळी जाऊ नये यासाठी श्रावणात मांसाहार केला जात नाही, हे शास्त्रीय कारण सर्वत्र सांगितले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.