Pimpri : शहरातील सर्व पूल वाहतुकीसाठी खुले

एमपीसी न्यूज – मुळा आणि पवना या दोन नद्यांना आलेल्‍या पुरामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 10 पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून होणारा विसर्ग देखील कमी झाला आहे. यामुळे पूरस्थिती नियंत्रणात आली असल्याने सर्व पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.

मागील आठवड्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणांची पाणीपातळी वाढली. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण भरली असल्याने त्यातून विसर्ग करण्यात आला. मुळशी आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळे मुळा आणि पवना नद्यांना पूर आला. नद्यांवर असलेले पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे प्रशासनाकडून हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. तसेच काही पुलापर्यंत पाणी गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून देखील काही पूल बंद केले.

मंगळवार पासून पावसाचा जोर कमी झाला असल्याने धरणांमधून होणारा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे. यामुळे नद्यांमध्ये येणारे पाणी कमी झाले. नद्यांमधील पाणी पातळी कमी झाली असल्याने नद्यांवरील बंद केलेले पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आले. येत्या 48 तासात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग वाढल्यास पुन्हा हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.