Pimpri: ‘नको बारामती, नको भानामती म्हणणा-या भाजपचे निर्णयही मुंबई, जालन्यातूनच!

एमपीसी न्यूज – ‘नको बारामती, नको भानामती’, शहरातील निर्णय शहरातच’ असे म्हणणा-या सत्ताधारी भाजपचे निर्णय देखील पिंपरी-चिंचवड शहरातून होत नाहीत. मुंबईतील ‘वर्षा’ बंगला, पुण्यातील कसबा पेठ आणि जालन्यातूनच भाजपचे निर्णय होत आहेत. त्यामुळे भाजपची ‘शहरातील निर्णय शहरातच’ ही घोषणा हवेतच विरली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ‘नको बारामती, नको भानामती’, शहरातील निर्णय शहरातच’ अशी टॅगलाईन वापरत प्रचार केला होता. या मजकुराचे शहरभर फलक लावले होते. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर शहरातील निर्णय शहरातच होतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली आहे.

भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘वर्षा’ बंगला, पालकमंत्री गिरीश बापट यांचे पुण्यातील कसबा पेठेतील निवासस्थान आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातूनच निर्णय होत आहेत. पहिल्यावेळी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष निवडीवेळी देखील निर्णय मुंबई, पुणे आणि जालन्यातूनच घेण्यात आला होता. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी देखील ‘वर्षा’ बंगला, पुण्यातील कसबा पेठ आणि जालन्यातूनच निर्णय घेण्यात आले.

भाजपचे निष्ठावान माऊली थोरात, मोरेश्वर शेंडगे आणि काँग्रेसमधून आलेले बाबू नायर यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदी आपल्या समर्थकाची वर्णी लागावी, यासाठी आमदार प्रयत्नशील होते. परंतु, निर्णय ‘वर्षा’ बंगला, कसबा पेठ आणि जालन्यातूनच घेण्यात आला.

त्यानंत महापौर, उपमहापौर बदल देखील ‘वर्षा’ बंगल्यावरील आदेशानंतरच करण्यात आला. तत्कालीन महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांचे राजीनामे घेतले. त्यांच्या जागी राहुल जाधव यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांची निवड करण्यात आली. दुस-या आणि तीस-या वेळेचे स्थायी समितीचे उमेदवार देखील ‘वर्षा’ बंगला आणि जालन्यातूनच ठरविण्यात आले.

त्यामुळे ‘नको बारामती, नको भानामती’, शहरातील निर्णय शहरातच’ असे म्हणणा-या सत्ताधारी भाजपचे निर्णय देखील पिंपरी-चिंचवड शहरातून होत नाहीत. मुंबईतील ‘वर्षा’ बंगला, पुण्यातील कसबा पेठ आणि जालन्यातूनच भाजपचे निर्णय होत आहेत. त्यामुळे भाजपची ‘शहरातील निर्णय शहरातच’ ही घोषणा हवेतच विरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.