Pimpri : आदित्य ठाकरेंना खूश करण्यातच अजित पवारांसह सगळ्यांचं भलं आहे -चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांचा 'कोरोना' साथीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराचा पाहणी दौरा

एमपीसी न्यूज – नुकतेच पार पडलेले अधिवेशन 93 तास चालले. या अधिवेशनात मूलभूत प्रश्नांना हात न घालता सरकारने केवळ आपल्या राजकीय सोयी करून घेतल्या आहेत. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांना खूश करण्यामध्ये अजित पवारांसह सगळ्यांचं भलं आहे. त्याच पद्धतीने निर्णय घेण्यात आले आहेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला मारला. भाजप सध्या प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. आम्ही महाराष्ट्रात ज्योतिरादित्य शिंदे शोधणार नाही. पण आपापल्यातल्या विसंवादामुळे हे सरकार लवकरच पडेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराचा पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, अॅड. सचिन पटवर्धन, उमा खापरे, नामदेव डहाके, सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आदित्य ठाकरेंना खुश करण्यासाठी मुंबईमध्ये आठ हजार कोटी रुपये किमतीची जागा प्रेक्षणीय स्थळ निर्माण करण्यासाठी दिली. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्राची सध्या नऊ हजार कोटी रुपये खर्च करून प्रेक्षणीय स्थळ निर्माण करण्याची स्थिती नाही. आठ ते नऊ हजार कोटी रुपयांमध्ये टँकर, जनावरांच्या छावण्या,विद्यार्थ्यांची फी असा दुष्काळाचा संपूर्ण खर्च निघतो. एवढा मोठा निधी केवळ प्रेक्षणीय स्थळाला दिला जात आहे. डिझाईन, डीपीआर काहीही तयार नसताना वारेमापपणे एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अधिवेशन लवकर संपवण्याचा निर्णय केला. सर्व लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसांघात जाऊन प्रशासनाला मदत कारता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशन सुरु असताना विधानसभेतही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तिथल्या प्रशासनाला राज्यातील ठिकठिकाणच्या प्रशासनाला मदत करता यावी, म्हणून अधिवेशन लवकर संपवण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले, “थेट नागरिकांमधून सरपंचांची निवड करण्याची पद्धत बंद करून सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वाशी आणि संभाजीनगर पालिकांच्या निवडणुकात प्रभाग पद्धत बंद केली आहे. महिला अत्याचारावर आधारित दिशा कायदा यावर सखोल चर्चा केली नसल्याचे सांगत महाविकास आघाडीने त्यांच्या पक्षांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे निर्णय घाईघाईने घेतले. 2015 ते 2018 या तीन वर्षांची कर्जमाफी दिली जात आहे. त्यातही केवळ पीक कर्ज माफ होत आहेत. यात शेडनेट, विहीर, जनावरे, शेती विकास यांचे कर्ज येत नाही. सरसकट सगळे कर्ज माफ करायला पाहिजे. त्याशिवाय शेतक-यांचा सातबारा कोरा होणार नाही. सरकार फसव्या कर्जमाफीचा ढोल जास्त वाजवत आहे.

महापालिकेतील भाजपच्या कारभारावर बोलताना पाटील म्हणाले, महापालिकेत उपसूचना कोणी आणल्यास त्यावर कारवाई करणार असल्याचे पाटील म्हणाले. तसेच एका माजी महापौरांच्या घरातील विवाह सोहळ्यास आपण उपस्थित राहणार नाही. सध्या असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याचे आयोजन करणे देखील बरोबर नसल्याचे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेसह अनेक महापालिकांचे पैसे येस बँकेत अडकलेले आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन यासाठी पाठपुरावा करायला हवा. महापालिका निवडणुकांमध्ये पुन्हा वॉर्ड नुसार निवडणूक लावली तर सर्वसामान्य नागरिक या स्पर्धेत टिकू शकणार नाही. भौगोलिक क्षेत्र मोठं होत नाही तोपर्यंत ती निवडणूक पैशांच्या आणि दमदाटीच्या वर येत नाही. भौगोलिक क्षेत्र वाढल्यास तत्वज्ञान, विकास आणि कामाच्या आधारे निवडणूक लढवली जाईल.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी चांगली पण…
कोरोनाचे संकट निवारण्यासाठी प्रशासनाने चांगल्या प्रकारे तयारी केली आहे. पण आणखी चांगल्या प्रकारे उपाययोजना करायला हव्यात. सध्या उद्भवलेली परिस्थिती प्रशासन उत्तमपणे हाताळत आहे. रुग्णालय, इमारत कोरोना बाधित आणि संशयितांसाठी तयार केली आहे. 20 टीम तयार केल्या आहेत. प्रशासनाने केलेल्या टीम वाढवणे आवश्यक आहे. टेस्टचा अहवाल 24 तासानंतर येतो, हा वेळ कमी करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त रुग्णालयांना तपासण्या करण्याची परवानगी द्यावी. कोरोना बाधित नागरिकांच्या घराच्या आसपासच्या नागरिकांचे प्रबोधन करून चांगल्या प्रकारे जनजागृती, प्रशिक्षित करायला हवे. नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अफवा पसरवू नये, त्यावर विश्वास ठेऊ नये, लोकप्रतिनिधींनी जनजागृती करण्यासाठी पुढे यावे, नगरसेवकांनी आपल्या प्रभागात हँडवॉश, सॅनिटायझर वाटावेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.