Pimpri: युती झाली खरी पण, दुभंगलेली मने जुळणार का?

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – होय…नाही…हो…करत अखेर शिवसेना-भाजपची लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली खरी पण, पिंपरी-चिंचवड शहरातील नेते, कार्यकर्त्यांची दुभंगलेली मने जुळणार का?. महापालिकेतील भाजपच्या कारभारवर शिवसेनेने अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. सत्ताधा-यांवर वेळोवेळी तोंडसुख घेतले असताना युतीच्या फॉर्म्युल्यानुसार मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपचे दोन्ही शिलेदार शिवसेनेच्या उमेदवारांचे काम करणार का?, नेत्यांची दुभंगलेली मने जुळणार का? कार्यकर्ते एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा करत लोकसभा, विधानसभा एकत्र लढविणार असल्याचे जाहीर केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर शिवसेनेने अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. रस्ते विकासकामात 90 कोटीचा भ्रष्टाचार, भाजप नेते महापालिका तिजोरीवर दरोडा टाकत आहेत. महापालिकेतील मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे भ्रष्टाचारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे केंद्रात- राज्यात सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षाच्या शहरातील नेत्यांचे कसलेच पटत नव्हते. परंतु, आता युती झाल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभांच्या व्यासपीठावर एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे. मात्र, निवडणुक असल्यामुळे नेते, कार्यकर्ते यांच्यात एकमेकांविषयी सांशकता कायम राहणार आहे.

  • युतीच्या फॉर्म्युल्यानुसार पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असलेले मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. श्रीरंग बारणे मावळचे तर शिवाजीराव आढळराव शिरुरचे लोकसभेत नेतृत्व करतात. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार मावळ आणि शिरुर मतदार संघातून संसदेत पाठवू या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा हवाला देत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकले होते. आता मात्र युती झाल्यामुळे आमदार जगताप हे बारणे यांचे आणि लांडगे हे आढळराव यांचे काम करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बारणे यांनी भाजप सरकारच्या निर्णयावर सातत्याने टीका केली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून बारणे यांना निवडून आणले. परंतु, निवडून आल्यानंतर बारणे यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारणे शिवसेनेचे उमेदवार असल्यास आणि युती झाल्यास तर आम्ही त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतली आहे. युती झाल्यास बारणे यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी काही दिवसांपुर्वी शहरात आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. यापार्श्वभूमीवर आता युती झाल्याने भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप हे खासदार बारणे यांचे लोकसभेला मनापासून काम करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

  • युती झाल्यामुळे आता खासदार बारणे आणि आमदार जगताप या दोघांनाही एक पाऊल मागे यावे लागणार आहे. आमदार जगताप यांना लोकसभेसाठी बारणे यांचे काम करावे लागणार आहे. एकदिलाने काम करावे लागणार आहे. कारण, जगताप हे भाजपचे शहराध्यक्ष देखील आहेत. आता बारणे यांचे काम केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप हे शिवसेना-भाजप युतीचे चिंचवडचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये समझोता होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभेचे घोडेमैदान दोन महिन्यावर आले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात भाजपचे शिलेदार शिवसेना उमेदवारांचे काम करणार का? हे कळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.