Pimpri : ‘पिंपरी येथील ‘एचए’ कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्या’

नगरसेविका गीता मंचरकर यांची पंतप्रधानांकडे मागणी

एमपीसी न्यूज – भारतातसह जगात कोरोना या साथीच्या आजारांने थैमान घातले आहे. या आजाराचा ज्या गतीने फैलाव सुरू आहे तो रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन लागु करण्यात आले आहे. या जीवघेण्या आजारापासुन बचावासाठी अधिक वैद्यकीय मनुष्यबळ व पुरेश्या औषधांची गरज आहे. त्यामुळे पिंपरी येथील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स या कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेविका गीता मंचरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भारत जगाला ‘हाड्रोआॅक्सिक्लोरोक्वीन’ या औषधाचा पुरवठा करत आहे. पिंपरी येथील’एचए’कंपनीत या औषधाची निर्मिती होऊ शकते. येथे सर्व यंत्रणा सज्ज असल्यामुळे त्वरित उत्पादनाला सुरुवात केली जाऊ शकते, असे मंचरकर यांनी या पत्रात म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांच्या सहकार्याने 1954 साली सुरू झालेल्या या कंपनीत सुरवातीला ‘पेनिसिलीन’ ची निर्मिती होत असल्याने ‘एचसीक्यु’चे उत्पादन सहज शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

एचए कंपनीपासून रस्ता व रेल्वे मार्ग जवळ असल्याने वाहतूकीसाठी अडचण निर्माण होणार नाही. कंपनीची औषध उत्पादनाची क्षमता मोठी असल्यामुळे देशातील मागणीचा योग्य पुरवठा केला जाऊ शकतो. पण काही अपरिहार्य कारणांमुळे हा प्लांट उत्पादन थांबवून बंद करण्यात आला. गरिबांना स्वस्तात औषध उपलब्ध व्हावी, या महात्मा गांधी यांच्या विचारातून स्थापन झालेल्या या कंपनीचा या आणिबाणीच्या परिस्थितीत यथायोग्य उपयोग होऊ शकतो. त्यामुळे सरकारने पिंपरी येथील ‘एचए’ कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मंचरकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.