Pimpri : एकदिवसाआड पाणीपुरवठा; अकार्यक्षम आयुक्त शहरवासीयांना वेठीस धरतायेत; गटनेत्यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – पवना धरणात मुलबक पाणीसाठा असतानाही सत्ताधारी भाजप, प्रशासनाला नियोजन करता येत नाही. जाणूनबुजून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे, नियोजन करता येत नाही. अनधिकृत नळजोड, पाणी गळती का रोखली जात नाही? असा सवाल करत अकार्यक्षम आयुक्तांकडून नागरिकांना नाहक वेठीस धरले जात आहे, असा हल्लाबोल विरोधी गटनेत्यांनी केला. शहरविकासाचे ‘व्हीजन’ नसलेल्या आमदाराच्या दबावाखाली आयुक्तांनी विनाकारण शहरवासीयांना त्रास देऊ नये, असाही सल्ला दिला. तर, जादा पाणी उपलब्ध नसल्यामुळेच एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु ठेवल्याचे सांगत सत्ताधा-यांनी त्याचे समर्थन केले.

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 77.5 टक्के पाणीसाठा आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत तब्बल 19 टक्के जादा पाणीसाठा आहे. 20 जुलैपर्यंत पुरु शकतो एवढा हा पाणीसाठा आहे. परंतु, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नियोजनशून्य, गलथान कारभारामुळे शहरवासीयांना हिवाळ्यातच एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून दोन महिन्यासाठी म्हणजेच 25 जानेवारी 2020 पर्यंत केलेला एकदिवसाआड पाणीपुरवठा यापुढे देखील कायम राहणार आहे. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा असूनही केवळ आयुक्तांच्या हट्टापायी शहरवासीयांना एक दिवसाआडच पाणी मिळणार आहे. त्यापार्श्वभूमीवर ‘एमपीसी न्यूज’ने महापालिकेतील गटनेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

महापौर उषा ढोरे यांनी एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचे समर्थन केले. एकदिवसाआड पाणी असल्याने नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा कायमस्वरुपी केला नाही. सात महिन्यासाठी हा पाणीपुरवठा राहणार आहे. जादा पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन सुरु आहे. देहू बंधा-यातून पाणी उचलण्यात आल्यानंतर दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे, असेही महापौर ढोरे यांनी सांगितले.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ”जादा पाण्याची उपलब्धता वाढली नाही. उपलब्धता वाढविल्याशिवाय दररोज पाणी देता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने सुरु ठेवलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला नागरिकांनी सहकार्य करावे”.

विरोधी पक्षनेते नाना काटे- गतवर्षीच्या तुलनेत पवना धरणात जादा पाणीसाठा आहे. असे असतानाही सत्ताधारी भाजप, प्रशासनाला नियोजन करता येत नाही. सत्ताधा-यांचा प्रशासनावर वचक नाही. नियोजन केले जात नाही. जाणूनबुजून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे का ? नियोजन का करता येत नाही? यामागे कोण आहे. आयुक्तांवर कोणाचा दबाव आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्याच्या पाणीसाठ्यात शहराला पाणीपुरवठा करण्यात प्रशासन अकार्यक्षम आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याला अधिकारीच जबाबदार आहेत. प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना नाहक वेठीस धरले जात आहे. आयुक्तांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा”.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे – धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. नियोजनाचा अभाव, सत्ताधा-यांचा अंकुश नसणे. शहरविकासाचे ‘व्हीजन’ नसलेल्या आमदाराच्या दबावाखाली आयुक्तांनी निर्णय घेऊ नयेत. आयुक्तांनी आमदारांचे ऐकून विनाकारण शहरवासीयांना वेठीस धरु नये. स्वतः माहिती घ्यावी आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा.

अपक्षांचे गटनेते कैलास बारणे- ‘शहरात अनधिकृत नळजोड मोठ्या प्रमाणात आहेत. वॉशिंग सेंटर, हॉटेल व्यावसायिकांकडे अनधिकृत नळजोड आहेत. महापालिकेकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. अनधिकृत किती नळजोड आहेत. त्याचा सर्व्हे केला नाही. मीटर निरीक्षक केवळ कार्यालयात बसून असतात. पाण्याची गळती, चोरी रोखली जात नाही. प्रशासनाने दोन महिन्याच्या मुदतीत कोणतीही कारवाई केली नाही. पाण्याचा नवीन पर्याय उपलब्ध केला जात नाही. पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरु होणे आवश्यक आहे. परंतु, त्यादृष्टीने पाऊले उचलली जात नाहीत.

मनसे गटनेते सचिन चिखले- एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा जाहीर निषेध करतो. भाजपचा नियोजनशून्य कारभार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दोन महिन्यासाठीच एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. दोन महिने उलटून सुद्धा सत्ताधारी पक्षाला पाण्याचे नियोजन करता आले नाही. प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. याचा निषेध करतो. याचा जाब विचारण्यासाठी मनसे आयुक्तांच्या दालनात धडक देणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.