Pimpri: आजी-माजी आमदारांपेक्षा अमित गोरखे ‘श्रीमंत’

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे आजी-माजी आमदारांपेक्षा श्रीमंत आहेत. गोरखे यांच्याकडे पाच कोटी 60 लाख तर माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे पावणे दोन कोटी तर विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याकडे 23 लाखाची संपत्ती आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अमित गोरखे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, महायुतीकडून गौतम चाबुकस्वार आणि महाआघाडीकडून अण्णा बनसोडे यांनी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिला आहे.

मुक्त विद्यापीठातून एम.ए झालेले अमित गोरखे यांची 3 कोटी 43 लाख स्थावर तर 1 कोटी 63 लाख जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर 64 लाख 93 हजार रुपयांचे कर्ज आहे. बँकेत त्यांच्या ठेवी असून 31 हजारांचे शेअर्स आहेत. 37 लाख 97 हजार रुपयांची त्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांनी 25 लाख 69 हजारांचे कर्ज दिले आहे. त्यांच्याकडे होंडा सिटी मोटर आणि एक ट्रॅक्टर आहे.

घोडेगाव, बेलवाडी येथे त्यांची शेतजमीन असून चालू बाजार भावानुसार त्याचे मूल्य 26 लाख 79 हजार आहे. तर, रावेत येथे बिगर शेतजमीन असून चालू बाजारभावानुसार 72 लाख त्याची किंमत आहे. निगडी, यमुनानगर येथे निवासी इमारत असून त्याचे मूल्य एक कोटी 70 लाख तर, एम्पायर इस्टेट येथील निवासी इमारतीचे मूल्य 74 लाख 45 हजार रुपये आहे. व्यवसाय आणि नोकरी उत्पन्नाचा स्त्रोत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

अण्णा बनसोडे यांच्याकडे एक कोटी 85 लाख

दहावी पर्यंतचे शिक्षण झालेले महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्याकडे एक कोटी 76 लाख स्थावर तर 9 लाख 67 हजार जंगम मालमत्ता आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि जनता सहकारी बँकेत त्यांच्या ठेवी आहेत. 12 तोळे सोने असून त्याची किंमत चार लाख 60 हजार रुपये आहे.

रावेत येथे त्यांची बिगरशेती जमीन असलून चालू बाजारभावानुसार त्याची किंमत एक कोटी 26 लाख रुपये आहे. चिंचवड येथे निवासी इमारत असून त्याची किंमत 50 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे 30 हजार रुपयांचे ‘रिव्हॉलव्हर’ देखील आहे.

गौतम चाबुकस्वार यांच्याकडे 23 लाखाची मालमत्ता

महायुतीकडून अर्ज दाखल केलेले गौतम चाबुकस्वार यांच्याकडे 23 लाख 48 हजारांची मालमत्ता आहे. स्टेट बँक, बँक ऑफ बडोदामध्ये त्यांच्या ठेवी असून श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात त्यांचे शेअर्सस आहेत. त्यांच्याकडे 22 लाख 65 हजारांची टोयोटा मोटार आहे. तर, 20 हजारांचे 5 ग्रॅम सोने आहे. त्यांच्यावर 6 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज आहे. आमदाराचे मानधन हे उत्पन्नाचे त्यांचे स्त्रोत आहे. बी.कॉम, एम.ए. एल.एल.बी, एम.फील शिक्षण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.