Pimpri : रिपब्लिकन युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीसपदी अमोल डंबाळे

एमपीसी न्यूज : रिपब्लिकन युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीसपदी वाल्हेकरवाडी येथील भीमसैनिक अमोल डंबाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाचे संस्थापक-अध्यक्ष राहूल डंबाळे यांनी ही निवड घोषित केली.

अमोल डंबाळे हे लहानपणापासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत.योद्धा सोशल फाऊंडेशनच्या प्रदेश सचिव म्हणून त्यांनी अल्पावधीत आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली आहे. दलित अत्याचाराविरोधात शहरात झालेल्या असंख्य आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

कोणताही राजकीय वारसा नसताना आंबेडकरी चळवळीसाठी दिलेलं योगदान आणि आंबेडकरी चळवळीसाठी झोकून देत काम करण्याची तयारी तसेच सर्व समाजासोबतचे सलोख्याचे संबंध आदी कामांची दखल घेत राहूल डंबाळे यांनी अमोल यांच्या खांदयावर रिपब्लिकन युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीसपदाची धुरा सोपवली आहे.

पदाच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणार. तसेच रिपब्लिकन युवा मोर्चाची ध्येय धोरणे तळागाळात पोहोचवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यावर भर देणार असल्याचे अमोल डंबाळे यांनी निवडीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.