Pimpri : मुंग्यांनी पोखरलेले झाड पीएमपीएमएल बसस्थानकावर कोसळले; तिघेजण जखमी, दुचाकीचे नुकसान

एमपीसी न्यूज – मुंग्यांनी पोखरलेले एक काट्यांचे झाड पीएमपीएमएल बसस्थानकावर कोसळले. यामध्ये तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. तर झाडाच्या फांद्याखाली दबल्यामुळे एका दुचाकीचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 8) दुपारी पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल शांताराम हांडे यांनी पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ हॉटेल रत्नासमोर असलेल्या पीएमपीएमएल बसस्टॉपवर एक सुकलेले काट्यांचे झाड दुपारी सव्वादोनच्या सुमारास पडले असून झाडाखाली काही लोक अडकले असल्याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्राचे जनरल अरुण कुमार वैद्य देवदूत अग्निशमन वाहनासह प्रभारी उपस्थानक अधिकारी शांताराम काटे, वाहन चालक गोविंद सरवदे, अग्निशामक विजय घुगे, संभाजी दराडे, प्रशिक्षणार्थी उपस्थानक अधिकारी समीर अहमद, किशोर खरात, सौरभ गिरकर हे घटनास्थळी दाखल झाले.

बस स्टॉपवर एक सुकलेले काट्यांचे झाड पडले होते. तसेच त्याखाली एक मोपेड दुचाकी (एम एच 14 / एच बी 0512) अडकली होती. जखमींना पोलिसांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जवानांनी बस स्टॉपवरील विजेच्या तारांची काळजी घेऊन झाड बाजूला केले. दरम्यान, झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. झाडाच्या खोडाचा काही भाग दुचाकीच्या पुढील भागावर पडल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे. मुंग्यांनी पोखरल्यामुळे झाड कोसळले असल्याचे निदर्शनास आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.