Pimpri: लॉकडाउनच्या दहा दिवसात तब्बल साडे सहा हजार रुग्णांची वाढ

Lockdown effect Corona Patients Increse in Pimpri chinchwad

जुलै महिना ठरतोय घातक;  23 जुलैपर्यंत वाढले तब्बल 11 हजार रुग्ण,  178 जणांचा मृत्यू,  लॉकडाउनचा परिणाम शून्य

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तुटण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमध्ये तब्बल 6 हजार 472  रुग्णांची वाढ झाली आहे. या दहा दिवसातील आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये साखळी तुटण्याऐवजी घट्ट झाली आहे.

आता ‘अनलॉक’मध्ये कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, शहरासाठी जुलै महिना धोकादायक ठरला आहे. या 23 दिवसात तब्बल 10 हजार 755 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 178 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मार्च, एप्रिल, अर्धा मे महिना शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती.  31 मार्चपर्यंत शहरात केवळ 12 रुग्ण होते.  तर, एकाचाही मृत्यू झाला नव्हता.

एप्रिल अखेर 120 रुग्ण झाले  तर,  5 जणांचा मृत्यू झाला होता. 22 मे पर्यंत शहरातील परिस्थिती आटोक्यात होती. 22 मे रोजी शहरात 265 रुग्ण होते.

पण, 22 मे रोजी रुग्णसंख्या कमी झाल्याचा दावा करत शहराला रेडझोनमधून वगळ्यात आले. तेव्हापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नऊ दिवसात तब्बल 257 रुग्णांची वाढ झाली.

मे अखेर शहरात 522 रुग्ण झाले.  तर, 8 जणांचा मृत्यू झाला होता.

जूनअखेर  शहरात 3029 रुग्ण होते. तर 77 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जुलैच्या 23 दिवसात तब्बल 10 हजार 755 रुग्णांची  वाढ झाली आहे. मृत्यूमध्ये प्रचंड वाढ झाली.  23 दिवसात तब्बल 178 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आजपर्यंत  शहरातील  255 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या  67 अशा 322 जणांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाउनपूर्वी म्हणजेच 13 जुलैपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 7,637 होती. त्यानंतर शहरातील कोरोनाची साखळी तुटण्यासाठी 14 ते 23 जुलैपर्यंत लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये तब्बल 6 हजार 472  रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये फक्त शहरातील 6,148  तर  महापालिका हद्दीबाहेरील 324 रुग्णांचा समावेश आहे.

 दहा दिवसांच्या लॉकडाउनमध्ये वाढलेली रुग्णसंख्या !

शहरातील    शहराबाहेरील   एकूण
14 जुलै –             535        22, 557
15 जुलै –             432        17, 449
16 जुलै –             501        46, 547
17 जुलै –             686        29, 715
18 जुलै –             656        33, 689
19 जुलै –             592        37, 629
20 जुलै –            643        37, 680
21 जुलै –              540       23, 563
22 जुलै –              886        41, 927
23 जुलै –              677       39, 716
एकूण  – 6,148     324        6,472

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.