Pimpri : ….तर महापालिका देखील खासगी तत्वावर चालविण्यास देणार का ?-दत्ता साने

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका भोसरी येथे नवीन रुग्णालय सुरु करणार आहे. मात्र रुग्णालयासाठी कुशल मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे हे रुग्णालय खासगी तत्वावर चालविण्यास देण्यात येणार आहे. असे कारण महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील रुबी ऑल केअर हे रुग्णालय महापालिकेने खाजगी तत्वावर चालविण्यास दिले आहे. त्याचे अनेक वाईट अनुभव नागरिकांना आले आहेत. त्यामुळे भोसरी येथे देखील असेच वाईट अनुभव नागरिकांना देण्याची इच्छा महापालिकेची आहे का? असा प्रश्न उपस्थित करत कुशल मनुष्यबळ अपुरे असेल तर महापालिका सुद्धा खाजगी तत्वावर चालविण्यास देणार का ? असा जाब विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्तांकडे विचारला आहे.

दत्ता साने म्हणाले की, “महापालिकेकडून भोसरी येथे नव्याने सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येत आहे. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालविणे महापालिकेला शक्य नसल्याने ते एखाद्या खाजगी संस्थेला चालविण्यासाठी देण्याचा विचार महापालिका प्रशासन करीत आहे. यापूर्वी महापालिकेने पिंपरी मधील वायसीएम रुग्णालयातील रुबी ऑल केअर सेंटर हे रुग्णालय एका खाजगी संस्थेला चालविण्यास दिले आहे. या रुग्णालयाबाबत नागरिकांना अनेक वाईट अनुभव आले आहेत. या रुग्णालयात शासनाच्या योजना योग्य पद्धतीने राबवत नाही. रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. रुग्णांशी उद्धट वर्तन यांसारख्या गंभीर तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. शहरातील वायसीएम सह तालेरा, जिजामाता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भोसरी, आकुर्डी, यमुनानगर, इंदिरा गांधी, खिंवसरा पाटील ही रुग्णालये चांगल्या प्रकारे नागरिकांना सेवा देत आहेत.

अपु-या कुशल मनुष्यबळाचे कारण देत भोसरी येथील रुग्णालय खाजगी तत्वावर देण्याचे नियोजन आहे. हे रुग्णालय खाजगी तत्वावर न देता शासनाने महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विविध संवर्गांतील पदे व त्यानुषंगिक वेतश्रेणीस मान्यता दिलेली आहे. या संस्थेमधून महापालिकेला भोसरी रुग्णालयासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार नाही का? एवढे पर्याय असताना देखील स्थानिक पुढा-यांच्या दबावाखाली महापालिका प्रशासन हा निर्णय घेत आहे का? असा सवाल देखील दत्ता साने यांनी उपस्थित केला आहे. 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सभेमध्ये ऐनवेळी रुग्णालयाचा प्रस्ताव मांडून त्याला मंजुरी देण्याची तयारी सत्ताधारी करत आहेत. या रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट महापालिकेने घातला तर नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येतील आणि कायदेशीर मार्गाने देखील यास विरोध करणार असल्याचेही साने म्हणाले.

भोसरी येथे सुरु होणारे रुग्णालय एकूण 100 खाटांचे असून येथे आत्तापर्यंत महापालिकेने 1 कोटी रुपयांची साहित्य सामग्री खरेदी केलेली आहे. या रुग्णालयात प्रसुती व बालरोग विभाग वगळता सर्व प्रकारचे वैद्यकीय विभाग असणार आहेत. प्रशासनाच्या मते महापालिकेला हे रुग्णालय चालविण्यासाठी 20 कोटीपर्यंतचा खर्च येणार आहे. तो महापालिकेला परवडणारा नाही. तसेच सध्या शहरात न्युरोलॉजीस्ट, नेफ्र्रॉलॉजीस्ट असे अनेक तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे रुग्णांना पुण्यात जावे लागते. यावर उपाय म्हणून भोसरी रुग्णालय भाडेतत्त्वावर दिले जाणार आहे.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय म्हणाले, “रुग्णालय चालविण्यास देण्यासाठी प्रशासनाने काही अटी-शर्ती बनवल्या आहेत. त्यानुसार कंत्राटदाराला हे रुग्णालय चालविता येणार आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा रहिवासी पुरावा असणाऱ्या सर्व नागरिकांना मोफत सुविधा दिल्या जातील. सरकार प्रमाणीत असलेली मोफत 368 औषधे नागरिकांना पुरवण्यात येतील. रुग्णालयातील 50 ते 60 टक्के खाटा या पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांसाठी राखीव असतील. राजीव गांधी योजना इतर नागरिकांसाठी रुग्णालयात उपलब्ध असेल. सर्व कर्मचारी हे कंत्राटदाराचे असतील. महापालिका या रुग्णालयाच्या कंत्राटदाराला कोणतेही भाडे आकारणार नाही तसेच मिळकत कर आकारणार नाही. महापालिकेने ठरविलेल्या सर्व गोष्टी योग्यारितीने राबवल्या जात आहेत की नाहीत याबाबत देखरेख करण्यासाठी एक नियंत्रक मंडळ देखील नेमले जाणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.