शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Pimpri: ‘यांत्रिकीकरणाची निविदा रद्द झाल्यामुळे ‘तिळपापड’ की ‘टीडीआर’ होत नसल्याचा राग?’

एमपीसी न्यूज – भाजप आमदारांचे महापालिका आयुक्त ऐकत नाहीत. त्यांचे प्रशासनावर नियंत्रण नाही. याचा आता कसा काय साक्षात्कार झाला. त्यांना खरोखरच जनतेचा कळवळा आहे की यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईची निविदा रद्द झाल्यामुळे त्यांचा तिळपापड झाला आहे की ‘टीडीआर’ होत नाहीत याचा राग आला, अशी शंका विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी भाजप आमदारांच्या आयुक्तांना पाठिवलेल्या ‘लेटर बॉम्ब’वर घेतली आहे.

यापूर्वी आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर सर्व खूष होते. मग आताच असे काय झाले कि आयुक्त अकार्यक्षम झाले. आम्ही सन 2017 पासून आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत होतो. त्यावेळी हे आयुक्त कार्यक्षम आहेत, असा दाखला ते देत होते, असेही काटे यांनी म्हटले आहे.

शहरातील विकासकामे मंदावल्याबाबत, आयुक्त प्रत्येक बाबतीत बोटचेपी भूमिका घेत असल्याबाबत, निविदा दरामध्ये तफावत ठेवत संशयास्पद भूमिका घेत असल्याबाबत गंभीर आरोप करुन प्रशासनावर नियंत्रण नसल्यामुळे अनेक विकास कामे प्रलंबित आहेत.

त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या विरोधात जाहीर भूमिका घेणार असल्याचा इशारा सत्ताधारी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे.

त्यावर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणतात, भाजपची सत्ता आल्यापासून शहरातील विकासकामांचा सर्व बट्याबोळ झालेला आहे. आतापर्यंत प्रत्येक विकासकामामध्ये पाहिजे तो ठेकेदार आणि पाहिजे त्या दरामध्ये कामे करुन घेतली जात आहेत.

प्रत्येक कामामध्ये भाजप पदाधिका-यांचा नको तेवढा हस्तक्षेप असल्यामुळे प्रत्येक विकासकामे रडतखडत होत आहेत. तसेच ती सुध्दा दर्जेदार होत नाहीत. कचरा संकलन असू दे, २४X7 पाणी पुरवठा योजना असू दे, शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण इत्यादी कामाच्या निविदांमध्ये भाजप पदाधिका-यांचा हस्तक्षेप असल्यामुळेच हि कामे व्यवस्थित मार्गी लागलेली नाहीत.

यांत्रिकी पध्दतीने शहरातील रस्ते साफ सफाईची कोट्यावधी रुपयांची निविदा काढण्यात आली. तेव्हाच ही निविदा व्यवहार्य नसून ठेकेदारांच्या फायद्यासाठीच राबविली गेली आहे. यामध्ये शहरातील गोरगरीब सफाई कामगाराचेच नुकसान होणार आहे.

हे तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी व मीही याबाबत दोन पत्रे देऊन यातील फोलपणा दाखवून दिलेला होता. तरीही भाजप पदाधिका-यांच्या रेट्यामुळे हि निविदा करण्याचे प्रयत्न होते. परंतु, आम्ही सातत्याने विरोध केल्यामुळे व जनमताच्या रेट्यामुळे आयुक्तांना माघार घ्यावी लागली.

आता यांना कसा काय साक्षात्कार झाला की, आयुक्त ऐकत नाहीत, त्यांचे प्रशासनावर नियंत्रण नाही. यांना खरोखरच जनतेचा कळवळा आहे की सदर यांत्रिकीकरणाची निविदा रद्द झाल्यामुळे त्यांचा तिळपापड झाला आहे काय ? का टीडीआर होत नाहीत, याचा राग आला आहे. नक्की यांचा रोष जनतेसाठी आहे की स्वत:साठी आहे हे पाहणे गरजेचे असल्याचेच नाना काटे यांनी म्हटले आहे.

ऐन पावसाळ्यामध्ये शहरातील रस्ते खोदण्यात आले. रस्त्यात खड्डे आहेत की रस्ता खड्यात आहे अशी अवस्था मागील वर्षी पावसाळ्यात झाली होती. ती अद्यापही दुसरा पावसाळा आली तरी तशीच आहे. ऐन पावसाळ्यामध्ये डांबरीकरणाची मलमपट्टी केली जाते.

परिणामी पाण्यामुळे रस्ता खराब होऊन परिस्थिती परत मुळ पदावर येते. परंतु, याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना सत्ताधारी पदाधिका-यांचे. सन २०१७ पासून स्थापत्य, आरोग्य, विद्युत इत्यादी विभागाच्या निविदा या सत्ताधा-यांच्या बगलबच्चांनाच मिळाल्या आहेत. त्यामुळे कामाचा दर्जाच राहिलेला नसल्याकडे काटे यांनी लक्ष वेधले आहे.

थेट पध्दतीने कोट्यवधी रुपयांच्या कोरोना साहित्याची खरेदी

कोरोना सारखी महाभंयकर महामारी सध्या शहरात सुरु आहे. परंतु याबाबत ना आयुक्त सजग आहेत, ना सत्ताधारी. कोरोना रोगाचे नियंत्रण करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता अनुभव नसलेल्या डॉक्टरांची नेमणुक करण्यात आली. त्यामुळे कोरोना रोगावर अजूनही नियंत्रण करता आलेले नाही.

कोरोनाच्या सुरवातीच्या काळात भाजपच्या नगरसदस्यांनी आयुक्तांचे जाहीर कौतुक करुन सगळीकडे हर्डीकर पटर्न राबवा म्हणून सुचविले होते. मग आताच आयुक्त अकार्यक्षम कसे झाले? कोरोनाच्या काळात कोरोना साहित्याची थेट पध्दतीने कोट्यवधी रुपयांची खरेदी झाली.

त्यामध्ये करोडो रुपयांचा भष्ट्राचार झाला. परंतु त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची चर्चा न करता बिनबोबट पध्दतीने साहित्य खरेदीला मंजुरी दिली गेली. येथे सुध्दा विरोधी पक्षाने आवाज उठवल्यानंतर समिती स्थापन करण्याबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले.

सन २०१७ पासून हा सावळा गोंधळ चालू आहे. परंतु याबाबत आतापर्यंत कधीच काही आवाज उठविला गेला नाही. आता वर्ष – दिड वर्षावर पालिकेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर आता भाजप पक्षाने शहरात किती काम केले आहे व आता आम्ही जनतेसाठी किती सजग आहोत हे दाखवून द्यायचे आहे काय ? असा सवाल करीत पिंपरी-चिंचवडमधील नागरीक आता फसणार नाहीत त्यांनी आपला कारभार पाहिला आहे, असा टोला काटे यांनी लगावला आहे.

भाजप पदाधिका-यांचे धाबे दणालेले

राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. सध्या कोरोनासाठी प्रथम प्राध्यान्य देऊन ते काम करीत आहेत. प्रत्येक आठवड्यामध्ये पुण्यात येऊन शहराबाबत आढावा घेत आहेत.

मागील दिवसामध्ये पालिकेच्या वॉर रुमलाही भेट देऊन शहरातील कोरोनाबाधिताची व त्याबाबत महापालिका करत असलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली आहे.

तसेच वेळोवेळी फोनव्दारेसुध्दा ते माहिती घेत असतात. त्यामुळे आता भाजपच्या पदाधिका-यांचे धाबे दणाणलेले दिसत आहे. म्हणून आयुक्तांवर गंभीर आरोप करुन प्रशासनाच्या विरोधात मोहिम उघडण्याचा इशारा दिला गेला आहे.

यातून मागील तीन वर्षात सत्ताधारी भाजपचे प्रशासनावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते. त्यामुळे शहराच्या विकासकामांस खीळ बसली याची एक प्रकारे कुबलीच दिली आहे, असे काटे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

spot_img
Latest news
Related news