Pimpri : माउंट एवेरेस्ट मोहिमेवर अनिल वाघ रवाना

एमपीसी न्यूज – जगातील उंच हिमालयीन शिखर माउंट एवेरेस्ट सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्याचे धाडस, जिद्द, चिकाटी लागते. हे धाडस केले आहे पिंपरी-चिंचवडमधील गिर्यारोहक अनिल वाघ यांनी. मागील वर्षी गंभीर अपघातामुळे एव्हरेस्ट सर करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले होते. ते यावर्षी पूर्ण करण्याचा त्याने निर्धार केला आहे.

अनिल वाघ यांनी सह्याद्री रांगेतील अतिशय कठीण समजला लिंगाणा किल्ला कोणत्याही साधन सामुर्ग्रीचा वापर न करता अवघ्या 22 मिनिटांत सर केला आहे. आत्तापर्यंत त्यांनी जवळपास 80 वेळा लिंगाणा सर केला आहे. तसेच सह्याद्रीतील अनेक ट्रेक व गड, किल्ले लीलया सर केले आहेत. तसेच हिमालयातील अनेक शिखरे त्यांनी सर केली आहेत. आता लक्ष्य आहे ते माउंट एवेरेस्ट सर करण्याचे. अनिल वाघ हे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत अग्निशामक दलात फायरमन पदावर कार्यरत आहेत. काल, बुधवारी तो पहाटे 6 च्या विमानाने काठमांडूच्या दिशेने रवाना झाला.

या मोहिमेबाबत अनिल वाघ म्हणाले, “गेल्या तीन वर्षांपासून एवेरेस्ट मोहिमेची तयारी करीत आहे. 2018 एप्रिल महिन्यात तो माउंट एवेरेस्टच्या दिशेने रवाना होणार होतो, परंतु मोहिमेच्या एक आठवडा अगोदर दुचाकीवरून घरी जात असताना अपघात झाला, त्यात माझ्या डोक्याला गंभीर इजा झाली होती, पाच दिवस कोमामध्ये होतो. त्यामुळे मागच्या वर्षी मोहीम पूर्ण होऊ शकली नाही”

या एव्हरेस्ट मोहिमेबाबत ते सांगतात “माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची 8848 मीटर (29029 फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सगरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात. एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी, के2 अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या इतके अवघड नाही”

एव्हरेस्ट चढाईसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. नेपाळच्या हद्दीत असलेली आग्नेयेकडील पर्वत रांग, व तिबेटच्या हद्दीतली ईशान्येकडील रांग. या व्यतिरिक्त अजूनही मार्ग आहेत परंतु ते फारसे वापरले जात नाहीत. या दोन मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग जास्त सोपा व सोईस्कर आहे. त्यामुळेच गिर्यारोहक या मार्गाने चढाई करणे पसंद करतात. याच मार्गाने सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी 1953 मध्ये पहिली चढाई केली होती.

या मोहिमेसाठी त्याला आमदार अण्णासाहेब बनसोडे यांनी आर्थिक मदत केली.सचिन तुपे, पी.के. राव, एन.के.गुप्ता, महाराष्ट्र मंडळ (टांझानिया), मुम्बई अग्निशामक दलाचे प्रमुख रहाणंदळे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ही मोहीम ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील दुधाणे यांच्या मार्गदर्शनखाली संपन्न होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.