Pimpri : अनिता खरात यांना शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने शाहीर योगेश यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘स्वर्गीय शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार’ शाहिरा अनिता खरात यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती महाराष्ट्र शाहीर परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढवळे यांनी दिली.

रुपये अकरा हजार रोख स्मृतिचिन्ह, शाहिरी फेटा आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप राहील. पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून आतापर्यंत महाराष्ट्रातल्या विविध भागातील नामवंत पुरुष शाहिरांना गौरवण्यात आले असून हा पुरस्कार मिळवणाऱ्या अनिता खरात (ऐवळे) या पहिल्याच महिला आहेत.

सांगली जिल्ह्यातील चिंचणी (ता. तासगाव) येथे वास्तव्यास असणाऱ्या अनिता खरात यांना कलेचा वारसा आई-वडिलांकडून मिळाला. क्रांतिशाहीर र. द. दीक्षित यांच्याकडून त्यांनी शाहिरीचे प्रशिक्षण घेतले असून स्व.शाहीर बापूराव विभुते आणि शाहिरा अंबुदेवी बुधगावकर हे त्यांचे प्रेरणास्थान राहिले आहे. वि. स. पागे विद्यामंदिर, चिंचणी येथे आपला पहिला कार्यक्रम करणाऱ्या अनिता खरात यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपली शाहिरी सादर केली आहे.

बालशाहीर पुरस्कार, क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार, पत्रकार संघ पुरस्कार, वैजापूर (औरंगाबाद) येथील शाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार, पंढरपूरचा लोकशाहीर भूषण पुरस्कार, नागपूरचा भीमशाहीर पुरस्कार, कुर्ला(मुंबई) येथील शिवशाहीर पुरस्कार, नागपूरचा झाशीची राणी पुरस्कार, सांगली येथील आदर्श महिलाशाहीर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी अनिता खरात या सन्मानित झाल्या असून आकाशवाणी, दूरदर्शन आणि अन्य वाहिन्यांवरून रसिकांपर्यंत पोहचल्या आहेत.

या पुरस्काराची निवड महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर, कार्याध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे, सरचिटणीस शाहिरा शीतल कापशीकर, प्रांतसदस्य शाहिरा प्रचिती भिष्णुरकर आणि संजीवनी महिला शाहिरा पथकाच्या अध्यक्षा शाहिरा वनिता मोहिते यांच्या समितीने जाहीर केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.