Pimpri: अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी पिंपरीत राष्ट्रवादी एकवटली

मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, एकवटले आहेत.

पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीतर्फे रिंगणात उतरलेल्या माजी आमदार अण्णा बनसोडे यांना या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीने केला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी उपमहापौर व नगरसेवक डब्बू आसवानी, उषाताई वाघेरे, निकिता कदम, पूर्व पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेविका मीना नाणेकर, शांती सेन, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे, शामाताई शिंदे, प्रसाद शेट्टी तसेच ऋषिकेश वाघेरे, संतोष वाघेरे, चिंधाजी गोलांडे, आनंदा उर्फ अण्णा कापसे, चंद्रकांत गव्हाणे, दत्तोबा नाणेकर, अमरजित यादव आदी पदाधिकारी व नेते माजी आमदार बनसोडे यांच्या प्रचारात एकवटल्याचे दिसत आहे.

_MPC_DIR_MPU_II

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी कालच काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्तेही प्रचारात उतरले आहेत. दरम्यान काल (शुक्रवारी) बनसोडे यांच्या प्रचारार्थ पिंपरीगावात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप केले. अण्णा बनसोडे यांना घड्याळाच्या चित्रासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील म्हणाले की, सन 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांचा केवळ 2 हजार 235 मतांनी झालेला पराभव प्रत्येक कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागला आहे. यावेळी बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून मागील पराभवाचा वचपा काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे वाघेरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.