Pimpri : कामगारनगरीची भाजप, शिवसेनेने भकासनगरी केली – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीने हजारो हातांना एकेकाळी रोजगार दिला. मात्र, नोटबंदी, जीएसटी यामुळे देशात मंदीची लाट आली असून त्याचा फटका या उद्योगनगरीतील अनेक कंपन्यांना बसला आहे. भाजप-शिवसेना सरकारने या कामगारनगरीची भकासनगरी केली आहे, अशी टीका पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी येथे केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीच्या वतीने आकुर्डी गावठाणात आयोजित बैठकीत माजी आमदार बनसोडे बोलत होते. यावेळी माजी महापौर मंगला कदम, माजी उपमहापौर राजू मिसाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेवक जावेद शेख, माजी नगरसेवक निलेश पांढारकर आदी उपस्थित होते. बनसोडे यांनी काळभोरनगर, आकुर्डी भागात कार्यकर्त्यांशीही संवाद साधला.

_MPC_DIR_MPU_II

बनसोडे म्हणाले, “नोटबंदी व जीएसटीमुळे देशात मंदीची लाट आली आहे. वाहन उद्योग क्षेत्रात प्रचंड मंदी आहे. साडेतीन लाख लोक बेकार झाले आहेत. बांधकाम क्षेत्रही मंदीच्या खाईत लोटले गेले आहेत. पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी आहे. वाहन उद्योग क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका पिंपरी चिंचवड शहरातील टेल्कोसह अनेक कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे कामगारवर्ग भयभीत झाला आहे. उद्या आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचे काय? हा प्रश्न त्याला भेडसावत आहे. मात्र, सरकारला त्याची काहीच काळजी नाही”

“पक्षांतर घडवणे व निवडणूका जिंकणे यातच सरकारची शक्ती खर्च पडत आहे. त्यामुळे एकेकाळी हजारो हातांना रोजगार दिलेल्या पिंपरी चिंचवडमधील कामगारांचे काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. उद्योग आणि कामगारांच्या मुळावर आलेले हे सरकार उलथवून टाकण्यासाठी आपल्याला कामगारांनी बळ द्यावे व पिंपरी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे” असे आवाहन माजी आमदार बनसोडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.