Pimpri : अण्णा बनसोडे यांचा 19 हजार मतांनी दणदणीत विजय

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे यांचा १९ हजार ५४८ भरघोस मतांनी विजय झाला आहे. आज विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांचा पराभव करून अण्णा बनसोडे यांनी विजय मिळवला आहे. अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार होते. त्यानंतर चाबुकस्वार निवडून आले. आता पुन्हा एकदा अण्णा बनसोडे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

पिंपरी मतदारसंघातून १८ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (गुरुवारी) म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झाली. मतमोजणीच्या एकूण २० फे-या झाल्या. विसाव्या वारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना ८६ हजार १८४ मते मिळाली. तर अॅड. गौतम चाबुकस्वार यांना ६६ हजार ५७६ मते मिळाली. पोस्टल मतदानामध्ये अण्णा बनसोडे यांना ११२ तर चाबुकस्वार यांना २०० मते मिळाली.

पहिल्या सहा फे-यांमध्ये महायुतीचे उमेदवार अॅड. गौतम चाबुकस्वार आघाडीवर होते. अचानक सातव्या फेरीनंतर अण्णा बनसोडे यांचे मताधिक्य वाढले. सातव्या फेरीत अण्णा बनसोडे यांनी ७६५ मतांनी आघाडी घेतली. ही आघाडी बनसोडे यांनी कायम ठेवली. मतमोजणीच्या एकूण वीस फे-या झाल्या. शेवटच्या फेरीत बनसोडे यांना ८६ हजार १८४ मते मिळाली. तर अॅड. गौतम चाबुकस्वार यांना ६६ हजार ५७६ मते मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.