Pimpri : अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण सामर्थ्यशाली आणि तरुण पिढीला प्रेरणा देणारे – अमित गोरखे 

एमपीसी न्यूज – लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याची निर्मिती केली. अण्णाभाऊंनी केलेले लिखाण समाजाला सदैव प्रेरणा देणारे असून तरुन पिढीने त्यांचे साहित्य वाचले पाहिजे, असे प्रतिपादन राज्य सरकारच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितचे सदस्य अमित गोरखे यांनी निगडी येथे केले. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार उपक्रमाअंतर्गत आज बुधवार (दि.1) ते रविवार (दि.5) ऑगस्ट या कालावधीत  अण्णाभाऊ साठे स्मारक, निगडी येथे प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी गोरखे बोलत होते. यावेळी  सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेविका कमल घोलप ,शर्मिला बाबर, उत्तम केंदळे, बाबा त्रिभुवन, मोरेश्वर शेंडगे, सुमन पवळे, समितीचे अध्यक्ष अरुण जोगदंड सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडगळे, संदीपन झोंबाडे, मनोज तोरडमल, धनंजय भिसे, बापू घोलप उपस्थित होते

गोरखे म्हणाले, “घरात अठरा विश्व दारिद्रय असताना अण्णाभाऊ यांनी साहित्याचे लिखाण केले. समाजाला दिशा देण्याचे काम त्यांच्या साहित्याने केले आहे. अण्णाभाऊ साहित्या व्यतिरिक्त उत्तम दांडपट्टा चालवायचे, दीड दिवस शाळेत जाऊन एवढी मोठी साहित्य कृती निर्माण करणे हे एक आश्चर्यच आहे. त्यांचे लिखाण परिस्थितीनुरूप जिवंत आणि शब्द प्रतिभेवर जबरदस्त पकड असल्याने त्यांनी लिहिलेले अनेक पोवाडे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत प्रेरणादायी ठरले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षणाचा मूलमंत्र जपून आपण सर्वांनी शिक्षणाची कास धरून परिवाराबरोबर समाज आणि राष्ट्राला प्रगती पथावर नेण्याचे काम आपले मूलभूत कर्तव्य समजून केले पाहिजे. राष्ट्र धर्म प्रथम कर्तव्य मानून प्रत्येकाने आपला काही वेळ समाजासाठी, राष्ट्रासाठी समर्पित करणे गरजेचे असल्याचेही गोरखे यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.